अबब....विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी चक्क हेलिकाॅप्टर

अपक्षांचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस संजय देरकर ही निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी 27 जानेवारीला लातूर येथील महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील स्वत: हेलिकॉप्टरने यवतमाळला येणार असल्याची माहिती संजय देरकर यांनी दिली
Helicopter Will Be used for Campaign of Yavatmal Council Election
Helicopter Will Be used for Campaign of Yavatmal Council Election

यवतमाळ  : विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे समीकरण निर्माण झाले असताना स्थानिक स्वाभिमानी महाविकास आघाडीने निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार स्वगृही परतल्यावर उरलेल्या तीन अपक्ष उमेदवारांनी स्थानिक स्वाभिमानी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय देरकर यांना समोर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

या आघाडीचा प्रचार हेलिकॉप्टरने होणार असून पहिल्यांदाच विधान परिषद निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर होणार आहे. 'उमेदवार लंडनचा हवा की स्थानिक' अशी स्थानिक स्वाभिमानी विकास आघाडीची 'टॅग लाइन'असणार आहे. यवतमाळ विधान परिषदेची पोटनिवडणूक शुक्रवार, ता. 31 जानेवारीला होत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी आहेत. तर भाजपने स्थानिक कंत्राटदार सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर येथील कॉंग्रेसचे माजीमंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र आहेत. त्यामुळे उमेदवार 'बाहेर'चा हवा की 'स्थानिक' यावरून बरीच चर्चा झाली. 

परंतु, ही कुबेरांची निवडणूक आहे. त्यामुळे मतदार तेवढ्या खोलवर विचार करताना दिसत नाही. मतदारांची नजर 'लक्ष्मी'वर आहे. महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांत लढत होत असताना स्थानिक स्वाभिमानी महाविकास आघाडीने जोर लावला आहे. या आघाडीतून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत उर्फ बाळासाहेब मुनगिनवार बाहेर पडल्याने अपक्षांची ताकद कमी झाल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, अपक्ष उमेदवार दीपक नीलावार, शंकर बडे व संजय देरकर यांनी एकत्रित येत पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

अपक्षांचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस संजय देरकर ही निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी 27 जानेवारीला लातूर येथील महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील स्वत: हेलिकॉप्टरने यवतमाळला येणार असल्याची माहिती संजय देरकर यांनी दिली. जिल्ह्यातील ज्या तालुक्‍यात हेलिकॉफ्टरला उतरविण्याची परवानगी मिळेल, त्याठिकाणी प्रचारासाठी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अपक्ष उमेदवारांचा प्रचार 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे. संजय देरकर बहुजन समाजातील व स्थानिक उमेदवार असल्याने ते महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारासमोर आव्हान उभे करतील, असे मत अपक्ष उमेदवार दीपक नीलावार यांनी व्यक्त केले. 27 जानेवारीला मतदारांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यातच अपक्ष उमेदवार आपली भूमिका मांडणार आहेत.

'विधानपरिषदचे सर्व मतदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना आपल्या भागाचा विकास करायचा आहे. त्यांनी आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराची निवड केली पाहिजे. स्थानिक स्वाभिमानी विकास आघाडीने स्थानिक व बहुजनातील उमेदवार पर्याय म्हणून दिला आहे -शंकर बडे, अपक्ष उमेदवार.

अपक्षांच्या आघाडीने रेटिंग वाढविले

उमेदवाराला मतदान करताना मतदारांना पसंती क्रमांक द्यावा लागणार आहे. सहा उमेदवार रिंगणात असल्याने एक ते सहापर्यंत पसंती क्रमांक देता येणार आहे. अपक्षांची आघाडी ताकदीने पुढे आल्याने या निवडणुकीत पसंती क्रमांकासोबतच 'रेटिंग'ही वाढले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com