धैर्यशील मानेंच्या 'मराठा कार्ड'ने रोखली शेट्टींची हॅट्ट्रिक!

धैर्यशील यांच्या विजयासाठी मोठा वाटा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाने उचलला.
धैर्यशील मानेंच्या 'मराठा कार्ड'ने रोखली शेट्टींची हॅट्ट्रिक!

इचलकरंजी (कोल्हापूर) : ऊसकरी शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा भाग हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघाने दोनवेळा राजू शेट्टींना खासदार केले होते. यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला. 

राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सातत्याने लढा दिला आहे. ऊसदर आंदोलनाला अनेकवेळा राज्यस्तरापर्यंत नेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. पहिल्या निवडणुकीत ते केवळ याच विषयावरून निवडून आले.

दुसऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबरोबरच भाजपच्या लाटेचा फायदा त्यांना झाला होता. या वेळेच्या लोकसभा निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार असणारच नाही, असाच समज त्यांचा होता. हाच समज त्यांना धोकादायक ठरला. एकूणच परिस्थिती पाहता श्री. शेट्टी यांनी भाजपच्या बरोबर न राहता कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची मते व कॉंग्रेस आघाडीची ताकद सहजपणे आपणास विजय मिळवून देईल, असाच समज त्यांचा पहिल्या टप्प्यात होता. 

श्री. शेट्टी यांचा विजयाचा वारू रोखण्यासाठी शिवसेना उमेदवाराची चाचपणी करीत होती. राष्ट्रवादीची असलेली जागा सोडून ती स्वाभिमानी संघटनेला दिल्यामुळे माने घराण्यात अस्वस्थता होती. अनेक वर्षे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सोबत असतानाही माने घराण्याने यावेळी पक्ष सोडला. राज्यातील शिवसेना आणि भाजपची वाढलेली ताकद, माने घराण्याची मतदारसंघात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे व मराठा समाजाचे असलेले मोठे अस्तित्व यांचा फायदा घेण्याचा निर्णय धैर्यशील आणि निवेदिता माने यांनी घेतला. त्यांनी थेट मातोश्रीचा रस्ता धरून लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य उचलले. हा निर्णय त्यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच घेतल्याने त्यांना मतदारसंघात संपर्क ठेवण्यास पुरेसा वेळ मिळाला. शिवसेना आणि भाजपचे असलेले आमदार यांचे पुरेपूर बळ धैर्यशील यांना मिळाले. शेट्टी यांच्यावर टीका करताना धैर्यशील यांनी युवा पिढीला मोठे बळ दिले. त्याचबरोबर नवीन असलेले लाखाहून अधिक मतदारांच कल, मोदी फॅक्‍टर व श्री. माने यांची वक्तृत्वशैली याला जोड लाभली. 

धैर्यशील यांच्या विजयासाठी मोठा वाटा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाने उचलला. मताधिक्‍क्‍यात तब्बल 60 ते 70 टक्के मताधिक्क इचलकरंजी मतदारसंघाने दिले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी राबविलेली प्रभावी प्रचार यंत्रणाही श्री. माने यांच्या विजयाला उपयुक्त ठरली.  शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने या पूर्वाश्रमीच्या स्वाभिमानीच्या शिलेदारांनी या वेळी शेट्टी विरोधांत प्रचाराची राळ उडविली होती. त्याचाही फटका शेट्टींना बसल्याचे दिसते. 

श्री. शेट्टी यांना वाळवा व शिराळा या मतदारसंघातून मताधिक्‍क्‍य मिळाले असले तरी हातकणंगले, शाहूवाडी आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मताधिक्‍क्‍य वरचढच ठरले. शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील- सरूडकर यांचा प्रभाव या निवडणुकीत स्पष्ट झाला आहे. श्री. माने यांनी मराठा कार्ड वापरून केलेली रणनीती त्यांच्या विजयास कारणीभूत ठरली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com