hasan mushriff about raju shetty | Sarkarnama

दूध संघामुळे शेट्टींना व्यवसायातील गमक कळाले, आता त्यांनी साखर कारखाना काढावा!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जानेवारी 2019

खासदार शेट्टी हेच खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहेत.

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीचा लढा पुकारला असून पहिल्यापासूनच त्यांची ही मागणी आहे. यामध्ये त्यांनी कारखानदारांच्या बरोबर कोणतीही तडजोड केली नसल्याचे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. 

खासदार शेट्टी हेच खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहेत, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कोल्हापूरच्या दौऱ्यात अडवणार, असे वक्तव्य श्री शेट्टी यांनी केले होते. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला, हे चुकीचे आहे. एकरकमी एफआरपी दिली नाही म्हणून त्यांनी आंदोलन करून कारखाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यावेळी एका विशिष्ट धर्माच्या लोकांचा ऊस गेला असून फक्‍त बहुजनांचा उस फक्‍त राहीला आहे, असे जातीय वक्तव्य करणारे पत्रक भाजप कार्यकर्त्यांनी प्रसिध्द करणे हे अत्यंत दुर्देवी असून त्यावर आपला आक्षेप असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. 

कोणताही कारखाने जात पाहून ऊस नेत नाहीत, क्रमपाळीप्रमाणे नेतात. ऊस दरावरून, पहिल्या उचलीवरून, उस परिषदेवरुन माझे व खासदार राजू शेट्टी यांचे आजही मतभेद आहेत व पुढेही राहणारच आहेत. एफआरपी एकरकमी कशी द्यायची? याबाबत अनेक वेळा माझा व खासदार श्री. शेट्टी यांचा संघर्ष झाला आहे व पुढेही चालूच राहील. 

गेल्या चौदा -पंधरा वर्षांमध्ये ऊस पिकाचे चार पैसे जादा मिळाले ते खासदार राजू शेट्टींमुळेच मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या मनातील ही भावना कोणीही पुसून काढू शकत नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करून कारखानदारांनाही शेतकऱ्यांचा योग्य मोबदला दिल्याशिवाय पर्याय नाही, हे करण्यास भाग पाडले आहे. मात्र बऱ्याचवेळा ते व्यावहारिक दृष्टिकोन ठेवत नाहीत, हट्टीपणा करतात. ज्या प्रमाणे दूध संघ काढून त्यांना दूध व्यवसायातील गमक कळाले तसेच त्यांनी साखर कारखाना काढावा किंवा चालवायला घेतला तर त्यातीलही गमक कळेल, असा टोलाही आमदार मुश्रीफ यांनी लावला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख