hasan mushriff | Sarkarnama

हसन मुश्रीफ लोकसभेच्या मैदानात 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

प्रा. मंडलिक यांनी 2014 ची लोकसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. पण तालुक्‍याच्या राजकारणात ते श्री. मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. 2014 ला कै. सदाशिवराव
मंडलिक हयात होते, त्यांच्या संपर्काचा त्यांना फायदा झाला. आता अशी स्थिती नाही. त्यामुळे त्यांना विधानसभेत आमदार करण्याचा "शब्द' देऊन श्री. मुश्रीफ
लोकसभेसाठी सज्ज होतील. पण ही तडजोड प्रा. मंडलिक मान्य करतील का ? यावर हे सर्व अवलंबून आहे. 

कोल्हापूर : वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वतःच लोकसभेची तयारी सुरू केल्याचे बोलले जाते.
विधानसभेची जागा प्रा. संजय मंडलिक यांना देऊन त्यांचा पाठिंबा लोकसभेला मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. याला प्रा. मंडलिक किती प्रतिसाद देतील यावरच या
घडामोडी अवलंबून आहेत. 

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडीक हे पक्षापासूनच दूर आहेत. महापालिका, नगरपालिका निवडणुकीत त्यांनी पक्षाविरोधात काम केले. जिल्हा परिषदेच्या
निवडणुकीत त्यांनी भाजप आघाडीच्या उमेदवारांचे केलेले "सारथ्य' पाहता त्यांची दिशा ठरलेली आहे. भाजपची पालखी त्यांच्याच खांद्यावर असेल. त्यामुळे राष्ट्रवादीला  त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार शोधावा लागेल. सद्यःस्थितीत मुश्रीफांइतका तगडा उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. श्री. मुश्रीफ यांचे जिल्ह्यातील नेटवर्क, सर्वपक्षीय
नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध, काम करण्याची धमक व तळागाळातील लोकांशी त्यांची जुळलेली नाळ पाहता तेच विद्यमान खासदारांविरोधात चांगली लढत देऊ शकतील असे चित्र आहे. 

दोन दिवसापूर्वी श्री. मुश्रीफ यांचा वाढदिवस लोकोत्सवाप्रमाणे साजरा झाला. गेल्या तीन-चार वर्षात वृत्तपत्रात जाहिराती देण्यापुरता मर्यादित असलेला हा वाढदिवस
जंगी स्वरूपात साजरा करण्यामागे हेही एक कारण आहे. प्रा. मंडलिक यांच्याशीही त्यांनी तालुक्‍यात जुळवून घेतले आहे. पंचायत समिती, नगरपालिकेत त्यांना
सामावून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. "हमीदवाडा' ची निवडणूक बिनविरोध करून हे ऋणानुबंध आणखी घट्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आजपर्यंतच्या लोकसभेचा
इतिहास पाहिला तर कागल तालुक्‍यातील उमेदवाराला या तालुक्‍यातून भरघोस मतदान मिळाले आहे. श्री. मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत व जनसंपर्क पाहता तेही या
तालुक्‍यातून इतरांपेक्षा जास्त मते घेतील. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने त्यांचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशीही चांगलेच सूर जमले आहेत. यापूर्वी विधानसभेत
राष्ट्रवादीची ताकद ही पी. एन. विरोधात असायची. यावेळी ती त्यांच्यामागे लावून त्यांचा लोकसभेत पाठिंबा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कोल्हापूर दक्षिण व
उत्तरमध्ये कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे चांगले वर्चस्व आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ-सतेज गट्टी चांगली जमली आहे. त्याचा फायदा श्री. मुश्रीफ
यांना होईल. राधानगरी-भुदरगडमध्ये के. पी., ए. वाय. यांच्याबरोबरच इतर पक्षांतील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. गडहिंग्लज, चंदगड व आजरा इतर
पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेले तालुके आहेत, या तिन्हीही तालुक्‍यात श्री. मुश्रीफ यांना म्हणून मानणारा वर्ग आहे, हा वर्ग त्यांच्यासोबत राहील. 
गेल्या पाच वर्षापासून सतेज-महाडीक यांच्यात सुरू असलेला संघर्ष टोकाला पोहचला आहे. त्यामुळे लोकसभेत राष्ट्रवादीकडून जरी श्री. महाडीक यांना उमेदवारी
मिळाली तरी पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले तरी सतेज त्यांचा प्रचार करतील असे वाटत नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत पी. एन. यांच्या
मुलासांठी श्री.मुश्रीफ यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तेही त्यांनाच पाठिंबा देतील. पण त्यांच्यासमोर "गोकूळ' च्या सत्तेची अडचण असेल. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख