पूरग्रस्तांना शासनाने नशिबाच्या हवाल्यावर सोडले : हसन मुश्रीफ यांची टीका

पूरग्रस्तांना शासनाने नशिबाच्या हवाल्यावर सोडले : हसन मुश्रीफ यांची टीका

कोल्हापूर : गेले आठवडाभर प्रचंड अतिवृष्टी होऊन उद्भवलेल्या गंभिर पुर परिस्थितीमध्ये शासनाने पूरग्रस्तांना त्यांच्याच नशिबाच्या हवाल्यावर सोडले, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला . शासनाच्या ढिसाळ प्रशासनाबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

ते म्हणाले, गेले सहा ते सात दिवस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे . हवामान खात्याने 11 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीचे स्पष्ट संकेत देऊन सुद्धा शासनाने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे . वास्तविक , एनडीआरएफच्या तुकड्या व बोटी यापूर्वीच आणून ठेवणे आवश्यक होते . असे असताना शासनाने लाखो पूरग्रस्तांना त्यांच्याच नशिबाच्या हवाल्यावरच सोडून दिले.

``माणसांबरोबरच मुक्या जनावरांचे हाल यापूर्वी कधीच इतके झाले नव्हते . जिल्ह्यामध्ये एवढा हाहाकार उडाला असताना आणि निम्म्या कोल्हापूर शहरासह करवीर तालुका , शिरोळ तालुका , कागल तालुका आणि गडहिंग्लज तालुका व इतरही तालुक्यातील अनेक गावातील गल्ल्याच्या गल्ल्या स्थलांतरित झालेल्या आहेत. त्यांना ना पाणी, ना जेवण , ना आरोग्याच्या सुविधा अशी दुरावस्था आहे. तशातच वीज पुरवठाही बंद आहे . अशी भयानक परिस्थिती उद्भवली असताना शेकडो वेळा पालकमंत्री हेलिकॉप्टरने व विमानाने कोल्हापूरला ये -जा करीत असताना यावेळी पाणी त्यांच्या आडवे यावे , हे आश्चर्यजनक आहे, असा टोला त्यांनी लगावला.

कोल्हापूर शहर , प्रयाग चिखली , आंबेवाडी व शिरोळ तालुक्यातील जनता फार मोठ्या संकटात सापडलेली आहे. या महाप्रलयात स्थानिक लोकप्रतिनिधी , स्थानिक स्वराज्य संस्था, तरुण मंडळे आणि सेवाभावी संस्था यांनी जे काम केले त्याबद्दल त्यांना सॅल्यूट! अशातच कोल्हापूर शहराच्या पुररेषेबाबत 30 ते 40 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चाही नागरिक करीत आहेत . याबाबत शासनाने तात्काळ 
कठोरपणाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे . या परिस्थितीत लहान -लहान चिमुकली , गरोदर भगिनी , म्हातारी माणसे यांना बाहेर काढताना त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पाहिल्यानंतर त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा आम्हाला काय अधिकार आहे ? काल मंगळवारी दी.६ सकाळी मी व्हिडिओ व्हायरल करून मुख्यमंत्र्यांना दौरा स्थगित करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती केली होती . बहुतांशी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तो माझा व्हिडिओ प्रसारित केला, अशे त्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे . स्थलांतरीत व इतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, खावटी , रोख रक्कम , पिण्याचे पाणी , औषधे , सिलेंडर , जेवणाची व रहाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी . तसेच , पाऊस संपल्यानंतर ज्या घरांची पडझड किंवा नुकसान झाले ती नुकसान भरपाई व उध्वस्त पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत इत्यादी निर्णय अपेक्षित आहेत, असे त्यांनी सुचविले.

अद्यापही प्रयाग चिखली , आंबेवाडी व शिरोळ तालुक्यातील काही गावांमध्ये अडकलेली माणसे आणि जनावरे अक्षरशा टाहो फोडीत आहेत . त्यांचे जे हाल होत आहेत, त्या नाकर्तेपणाला फक्त आणि फक्त शासनच जबाबदार आहे. पावसाचा हा जोर आणि सातत्य असेच राहिल्यास भयानक परिस्थिती ओढवू शकते . याबाबत शासनाने दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यापूर्वी 2005 साली असा भयानक महापूर आला होता. त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा महाप्रलय 1983 साली आला होता . परंतु; या वर्षीचा महाप्रलय 1983 पेक्षा जादा भयंकर वाटावा असेच जाणवते , असे मुश्रीफ म्हणाले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com