जिल्हा बॅंक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करा : हसन मुश्रीफ

मुश्रीफ यांच्यामुळे बॅंक प्रगतीपथावर आली. स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी ज्या खात्याचा चेहरामोहरा बदला तेच ग्रामविकास खाते श्री. मुश्रीफांकडे आले आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातील लोकांच्या विकासाचे प्रश्‍न सुटले पाहीजेत अशी तळमळ असलेल्या व्यक्तीकडेच हे खाते आले आहे. या माध्यातून ते जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकतील.'
 जिल्हा बॅंक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करा : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : जिल्हा बॅंकेचा कारभार करत असताना राजकीय हेतून कोणाचेही कर्ज प्रकरण थकवून कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून यावेळची जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले. जिल्हा बॅंकेच्यावतीने मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल श्री. मुश्रीफ यांच्यासह गृहराज्यमंत्री सतेज पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा आज खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. मुश्रीफ बोलत होते. 

ते म्हणाले," मी जिल्हा बॅंकेचा संचालक 1985-86 ला झालो. गेली 40 वर्षे समाजकारण आणि राजकारण करताना सर्वात मोठी मदत जिल्हा बॅंकेची झाली. बॅंकेचा संचालक झाल्यानंतर कधी मागे वळून बघितलेच नाही. म्हणून जिल्हा बॅंक ही माझी राजकारणाची जननी आहे. पाच वर्षापूर्वी बॅंकेत येतानाच एक व्हिजन ठरवले होते. त्याला संचालकांनीही सहकार्य केले. जिल्हा बॅंक ही मातृसंस्था आहे, त्यावर जिल्ह्यातील इतर संस्थांचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणून बॅंकेत येताना राजकीय पादत्राणे बाहेर काढून ठेवण्याचे आवाहन केले होते, त्याला इतर संचालकांनीही साथ दिली. बॅंकेचा भत्ता, वाहन घ्यायचे नाही, हॉटेल बंद केले आणि वसुलीत कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. त्यामुळेच गेली दोन वर्षे बॅंक देशात एक नंबरवर आहे.' 

कर्जमाफीवर बोलताना ते म्हणाले," आम्ही मंत्री होण्यापूर्वी कर्जमाफीचा निर्णय झाला. त्यात त्रुटी आहेत, प्रामाणिकपणे कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांचा त्यात समावेश नाही. पण त्याविरोधात संस्थांना कुलुप लावून काम होणार नाही. पैशाचे सोंग करता येत नाही. म्हणून संस्था पातळीवर किती रक्कम लागणार हे कळाल्याशिवाय त्याचे नियोजन अशक्‍य आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर हा प्रश्‍नही मार्गी लागेल.' 

खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले,"पाच वर्षापुर्वी बॅंक अडचणीत होती. बॅंकेचा परवाना रहातो का नाही अशी स्थिती होती. पण श्री. मुश्रीफ यांच्यामुळे बॅंक प्रगतीपथावर आली. स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी ज्या खात्याचा चेहरामोहरा बदला तेच ग्रामविकास खाते श्री. मुश्रीफांकडे आले आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातील लोकांच्या विकासाचे प्रश्‍न सुटले पाहीजेत अशी तळमळ असलेल्या व्यक्तीकडेच हे खाते आले आहे. या माध्यातून ते जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकतील.' 

राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले,"श्री. मुश्रीफ यांच्या रूपाने जिल्हा बॅंकेला कणखर नेतृत्त्व मिळाले. सहकाराच्या माध्यमातून आमच्यासारखी मंडळी समाजकारणात, राजकारणात आली. सामान्य माणसाला आधार देण्याची शिकवणूक या सहकाराने दिली. बॅंक हे दुधाचे भांडे आहे ते जपून ठेवण्याची जबाबदारी श्री. मुश्रीफ यांच्यावर आहे. बॅंक ही नियमाप्रमाणे चालवली पाहिजे या हेतूने काम करत असताना आम्हालाही कर्ज नाही हे सांगण्याची त्यांची पध्दतही चांगली आहे. दिलेला पैसा परत आला पाहिजे या भावनेतूनच श्री. मुश्रीफ काम केले. म्हणूनच तुमच्या नेतृत्त्वाखाली बॅंक चालली पाहीजे अशी भावना निर्माण झाली आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम श्री. मुश्रीफ यांनी केले. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातूनही विकासाला गती देण्याचे काम ते करतील.' 

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले,"शिरोळचे नेतृत्त्व करण्याचे स्वप्न कै. शामराव पाटील-यड्रावकर यांचे होते, पण त्यांना ते शक्‍य झाले नाही. पण त्यांचा वारसा गेली पंधरा वर्षे चालवण्याचे काम मी केले. त्यात जिल्हा बॅंकेचाही वाटा मोठा आहे. श्री. मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री म्हणून काम करताना माझ्याकडे असलेल्या सर्व खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com