Has Sanjay Raut given offer to Prashant & Apurv Hire ? | Sarkarnama

 संजय राऊत यांनी  हिरे यांना दिली  शिवसेनेची ऑफर?

सरकारनामा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

शिवसेनेकडून विचारणा झाली

याबाबत माजी आमदार अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आपण नाराज नसल्याचे सांगितले. शिवसेनेकडून विचारणा झाली असून, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नसल्याचे सांगितले. खासदार राऊत यांची सदिच्छा भेट असल्याचा खुलासा त्यांनी केला. 

नाशिक :  माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्यासह माजी आमदार अपूर्व हिरे व जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने ऑफर दिली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे .  मंगळवारी (ता. 14) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

याभेटीत काय चर्चा  झाली याबाबत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यात उत्सुकता आहे .

खासदार राऊत यांनी मुंबईकडे जात असल्याचे सांगून थेट हिरे यांचे त्र्यंबक रोडवरील निवासस्थान गाठल्याने शिवसेनेचे स्थानिक नेतेसुद्धा अचंबित झाले. 

खासदार राऊत मंगळवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत कामकाजाचा आढावा घेतला. परंतु त्यांचा मंगळवारचा दौरा गाजला तो हिरे कुटुंबीयांची निवासस्थानी भेट घेण्यावरून. दुपारी खासदार राऊत यांच्यासह शिवसेनेच्या मोजक्‍या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री प्रशांत हिरे, अपूर्व हिरे व अद्वय हिरे यांची भेट घेतली. बैठकीतील तपशील बाहेर पडला नाही.

 माजी आमदार अपूर्व हिरे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर दिसू लागल्याने ते राष्ट्रवादीमध्ये जातील, अशी अटकळ बांधली गेली; परंतु अद्यापही त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही.

राष्ट्रवादी प्रवेशाला विलंब होत असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. शिवसेनेनेदेखील निवडणुकांपूर्वी मतदारसंघांची बांधणी सुरू केल्याने त्या पार्श्‍वभूमीवर हिरे कुटुंबीयांची भेट घेण्यात आल्याची चर्चा आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख