गर्दीत आई-वडील दिसताच हर्षवर्धनने थांबवली मिरवणूक - Harshwardhan Sadgir Got Huge Welcome at Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

गर्दीत आई-वडील दिसताच हर्षवर्धनने थांबवली मिरवणूक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 जानेवारी 2020

महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्यावर काल (ता. १२) त्याने प्रशिक्षण घेतलेल्या हर्षवर्धन सदगीर भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेत आला होता. यावेळी नाशिक रोड ते भगूर अशी दहा किलोमीटरची मिरवणूक निघाली. त्यात ठिकठिकाणी त्याचे स्वागत झाले

नाशिक : महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यावर हर्षवर्धन सदगीरचा काल त्याने प्रशिक्षण घेतलेल्या बलकवडे व्यायामशाळेत सत्कार झाला. यावेळी त्याची दहा किलोमीटर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत रस्त्यावर उभे असलेले  आई वडिल दिसताच त्याने मिरवणूक थांबवली. रथातून उतरुन त्यांना वाकून नमस्कार केला. तेव्हा पाणवलेल्या डोळ्यांसह आईने त्याला अलिंगन दिले. या प्रसंगाने हर्षोल्हासीत मिरवणुकीतील गर्दी काही काळ भावनिक झाली.

महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्यावर काल (ता. १२) त्याने प्रशिक्षण घेतलेल्या हर्षवर्धन सदगीर भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेत आला होता. यावेळी नाशिक रोड ते भगूर अशी दहा किलोमीटरची मिरवणूक निघाली. त्यात ठिकठिकाणी त्याचे स्वागत झाले. विहितगाव येथे लाडूची तुला करण्यात आली. भगूर शहरात हजारोंचा सहभाग असलेली मिरवणूक निघाली. यावेळी हर्षवर्धनला रस्त्यावर त्याचे आई, वडिल उभे असल्याचे दिसले. तेव्हा त्याने मिरवणूक थांबवली. रथातून उतरत गर्दीतून वाट काढीत तो बाहेर निघाला. तेव्हा अनेकांना काय झाले हेच कळेना. हर्षवर्धन रस्त्याच्या कोपऱ्यात जात त्याने आई, वडिलांना नमस्कार केला. तेव्हा आईचे डोळे पाणावले. तिने त्याला अलिंगन दिले. यावेळी हजारोंची गर्दी हा क्षण डोळ्यात साठवून ठेवत होती.

नाशिक रोडला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी एकच्या सुमारास हर्षवर्धनचे आगमन होताच युवा कार्यकर्ते, पहिलवान आणि खेळाडूंनी मोठ्या जल्लोषात त्याचे स्वागत केले. या वेळी आतषबाजी आणि डीजेच्या तालावर नाचून युवकांनी जल्लोष केला. हर्षवर्धनने सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. याठिकाणी शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा सत्कार केला. त्यानंतर एका चित्ररथातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून नाशिक- पुणे महामार्गाने बिटको चौक, महात्मा गांधी रोड, मुक्तिधाम, सत्कार पॉइंट, देवळालीगाव, लॅम रोड, विहितगाव, देवळाली कॅम्प, देवीमंदिर, भगूर या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. विहितगाव येथे लाडूतुला झाली. कृषमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला.

भगूर व्यायामशाळेत गदेचे पुजन झाले. यावेळी गोरखनाथ बलकवडे, विशाल बलकवडे, प्रेरणा बलकवडे, आमदार हिरामन खोसकर, सरोज अहिरे, सीमा हिरे, माजी आमदार योगेश घोलप, शिवजन्मोत्सव समितीचे राजेश फोकणे, विक्रम कोठुळे, श्रीकांत मगर, बंटी भागवत, शिवाजी हांडोरे, स्वप्नील कोहोक, किशोर वाघ, प्रफुल्ल शिंदे, हृषीकेश गायधनी आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख