`बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विजयसिंह मोहिते हे शब्द पाळणारे नेते`

`बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विजयसिंह मोहिते हे शब्द पाळणारे नेते`

इंदापूर : इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दगाबाजी, काँग्रेस नेत्यांची हतबलता यामुळे व्यथित झाल्याचे सांगत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा दिला.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगणात विराट सभेस कौल मागितला असता सभेने त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी जनतेचा कौल मान्य करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. मात्र या संदर्भात तालुका व जनतेचे हित लक्षात घेऊन येत्या 10 सप्टेंबर रोजी प्रवेशाचा निर्णय घेण्याची घोषणा केली.

इंदापूर काँग्रेसच्या वतीने येथील जुन्या इंदापूर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब डोंबाळे पाटील हे होते. यावेळी श्री पाटील यांचा सत्कार निरा भीमा कारखाना अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केला. यावेळी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणते चिन्ह व पक्षातून लढायचेयाचे अधिकार श्री. पाटील यांना ठरवाद्वारे देण्यात आले. यावेळी  पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.

राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांशी कशी फसवणूक केली याचा पाढा त्यांना यानिमित्ताने वाचला. पाटील  म्हणाले, पंचवीस वर्षांपासून आपण राजकीय कार्यकर्ता असून दिवंगत खासदार शंकरराव पाटील व आमदार राजेंद्रकुमार घोलप यांच्या स्वाभिमानी विचारसरणीने काम करत आलो आहे. लोकसभेस आपण पाच वेळा आघाडीचे काम केले. मात्र विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने दगाबाजी केली.``

``आपले चुलते शंकरराव पाटील यांना आमदारकी देण्यासाठी, राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदासाठी तसेच 95 साली माझ्या उमेदवारीस विरोध केला. मात्र मी विधानसभेत विजयी झाल्यानंतर शंकरराव पाटील मला घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. त्यांनी मला राज्यमंत्री करून शब्द पाळला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मला धाकट्या भावाप्रमाणे वागणूक दिली. 1999 ला विधानसभेत विजयी झाल्यानंतर युतीचे शासन न आल्यामुळे मुंडे यांनी मला दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे नेले. त्यांनी मला मंत्रिपद देऊन शब्द पाळला. सन 2004 ला आघाडीचे तिकीट आरपीआय आठवले गटास दिले. मात्र पुन्हा मी अपक्ष म्हणून निवडून आलो. सन 2009 ला काँग्रेसने तिकीट दिले मात्र राष्ट्रवादीने बंडखोरी केली. दिग्विजयसिंह व शरद पवार यांच्याशी चर्चा होऊन बंडखोरी मागे घेण्याचे ठरले. त्यानुसार शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास फोन केला. मात्र अजित पवार यांनी उमेदवारास अर्ज मागे घेतला तर याद राख असे सुनावले,``अशी आठवण त्यांनी सांगितली.

``अजित पवारांनी 2009 च्या निवडणुकीत बंडखोराला (आमदार भरणे यांना) बळ दिले. त्यावेळी शरद पवार हे माझ्या प्रचारासाठी आले. नंतर अजित पवार यांनी बंडखोरास पक्षातून काढले. मात्र सहा महिन्यांतच त्याला जिल्हा परिषदेचे सदस्य करुन अध्यक्ष केले. तरी सुद्धा 2014 व 2019 च्या निवडणुकीत आघाडी धर्माचे पालन केले. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे 2019 च्या निवडणुकीपूर्वी माझ्याकडे आले. त्यांनी विधानसभेचा शब्द दिला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, उल्हास पवार ,विश्वजित कदम हे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार व राहुल गांधी जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे 71 हजारांचे विक्रमी मताधिक्य देऊन सुप्रिया सुळे यांना निवडून आणले. ते जर मताधिक्य मिळाले नसते तर सुप्रिया सुळे यांची काय अवस्था झाली असती, असा सवाल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा पूर्वनियोजित नसताना देखील इंदापूरला आणून राष्ट्रवादीने विश्वासघात केला. जिल्हा बँकेला सर्वात जास्त व्याज कर्मयोगी कारखान्याने दिले. तरी कारखान्याची सातत्याने अडवणूक केली गेली. तालुक्यास पाच वर्षापासून शेतीच्या पाण्यासाठी वंचित ठेवले, उद्योग धंदे आले नाहीत. त्यामुळे तालुक्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अन्याय, दगाबाजी व केलेला अपमान सहन न करता निष्ठावंत, स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी आरपारची लढाई लढणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. 

विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेले काम त्यांनी नेहमी पूर्ण केले. त्यामुळे एकीकडे शब्द पाळणारी माणसे आहेत. तर दुसरीकडे शेजारची लबाड माणसे आहेत. देश, राज्यातील हवा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांच्या विचाराशी सहमत असून भाजपा प्रवेशाचा निर्णय 10 सप्टेंबर रोजी घेण्याचे  सुतोवाच त्यांनी केले.

यावेळी कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, मुरलीधर निंबाळकर, पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप, माजी सभापतीविलास वाघमोडे, रमेश जाधव व डॉ. नंदकुमार सोनवणे ,नगराध्यक्षा अंकिता शहा, फिरोज पठाण, दिपक जाधव यांची भाषणे झाली. 

यावेळी उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, भरत शहा, ऋतुजाताई पाटील, भास्कर गुरगुडे, सुभाष काळे, हनुमंत जाधव, महेंद्र रेडके, बाळासाहेब मोर, गोपीचंद गलांडे, शेखर पाटील, गोरख शिंदे, सतीश व्यवहारे, दादासाहेब पिसे, डॉ. अश्विनी ठोंबरे, ऍड. रणजित बाबर पाटील हे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com