पुणे जिल्हा काॅंग्रेसमध्ये हर्षवर्धन समर्थकांचा वेगळाच गट

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये गेल्याने इंदापूर तालुक्यातील काॅंग्रेस केवळ कागदावर उरली आहे.
harshwardhan patil supporters in congress but only on paper
harshwardhan patil supporters in congress but only on paper

पुणे : राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्हा कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. परिणामी, इंदापूर तालुक्‍यातील कॉंग्रेसचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक आदींनी पाटील यांच्यासमवेत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला नसला, तरी या सर्वांनी विधानसभा निवडणुकीत पाटील यांचाच प्रचार केल्याची चर्चा जिल्हा कॉंग्रेसमध्ये रंगू लागली आहे.

परिणामी, इंदापूर तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी हे आता केवळ तांत्रिकदृष्ट्या कॉंग्रेसमध्ये उरले आहेत. सध्या या सर्वांची स्थिती मनाने भाजप आणि देहाने कॉंग्रेसमध्ये असल्यासारखी झाली आहे.

यामध्ये इंदापूर तालुक्‍यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इंदापूर नगरपालिकेवर कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. यामुळे इंदापूर नगरपालिका आणि पंचायत समितीत कॉंग्रेसचे बहुमत असले, तरी या दोन्ही संस्था हर्षवर्धन पाटील गटाच्या ताब्यात जाणार आहेत. या दोन्ही संस्था केवळ कागदोपत्री कॉंग्रेसच्या ताब्यात असणार आहेत. कारण, या संस्थांवरील कॉंग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी हे हर्षवर्धन पाटीलसमर्थक असून, ते आजही त्यांच्यासोबत आहेत. मात्र, त्यांनी अद्यापही भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नसल्याचे जिल्हा कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

इंदापूर तालुक्‍यातील सातपैकी तीन जिल्हा परिषद सदस्य कॉंग्रेसचे आहेत. पंचायत समितीत 14 पैकी 9 सदस्य आणि इंदापूर नगरपालिकेतील 17 पैकी 9 नगरसेवक हे कॉंग्रेसचे आहेत. शिवाय, नगराध्यक्षा अंकिता शहा याही कॉंग्रेसच्या आहेत. याशिवाय, कर्मयोगी शंकरराव पाटील आणि नीरा भीमा हे दोन कारखाने पाटील यांच्याकडे आहेत.

झेडपीत तीन विरुद्ध चार सदस्य
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे येथे पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अन्य कोणत्याही पक्षाच्या मदतीची गरज भासणार नाही. याउलट जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे केवळ सात सदस्य आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्‍यातील तीन, भोर व पुरंदरमधील प्रत्येकी एक आणि वेल्हे तालुक्‍यातील दोन सदस्यांचा समावेश आहे. यापैकी इंदापुरातील तीन सदस्य हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कॉंग्रेस सदस्यांमध्ये पाटीलसमर्थक तीन विरुद्ध चार असे दोन गट निर्माण झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com