लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन हर्षवर्धन पाटील यांचा नवा `श्रीगणेशा`

लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन हर्षवर्धन पाटील यांचा नवा `श्रीगणेशा`

पुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन आपल्या नवीन राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. पाटील घराणे हे सत्तरहून अधिक काळ काॅंग्रेसशी संबंधित होते. हा संबंध तोडून ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

पाटील यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलेही होती. त्यांचा दुपारी तीन वाजता भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. पाटील हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून हाताच्या पंजावर निवडून आले. मात्र त्यांना 1995 मध्ये विधानसभेची उमेदवारी काॅंग्रेसने दिली नाही. त्यामुळे त्यांनी 1995 ची विधानसभा निवडणूक विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढून हाताच्या पंजाला हद्दपार केले होते. सन 1999 व 2004 मध्येही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. ते 2004 च्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले.

त्यांच्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी घड्याळ हे चिन्हे घेतले होते. तेव्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापन झालेली नव्हती. त्यामुळे हे घड्याळ चिन्ह अपक्षांना मिळत होते.  ते बंडखोर म्हणून निवडून आल्यानंतर राज्यमंत्री बनले. नंतर 1999 च्या निवडणुकीत विमान चिन्ह घेतले आणि कॅबिनेट मंत्री बनले. राष्ट्रवादीच्या दबावानंतर त्यांना काही दिवसांतच राजीनामा द्यावा लागला. पण परत अपक्ष आमदारांचे सहकार्य लागल्याने पाटील पुन्हा मंत्री झाले. 

पाटील यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणूक कॉंग्रेसच्या चिन्हावर लढवली व तालुक्‍यात गेल्या 15 वर्षांपासून गायब असलेले पंजाचे चिन्ह दिसू लागले. पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग 19 वर्षे नेतृत्व केले. त्यांनी सहा मुख्यमंत्र्यांबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळात काम करून इंदापूरचे नाव राज्याच्या राजकारणात झळकविले. तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते.

पाटील यांनी सन 2014 ची विधानसभा निवडणूक कॉंग्रेसकडून लढवली. त्या वेळी मात्र त्यांचा पराभव झाला. तसेच, राज्यातून दोन्ही कॉंग्रेसचे सरकार हद्दपार झाले. गेल्या वर्षभरापासून कॉंग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांची कोंडी करण्याचे काम सुरू केले होते. लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीचे काम प्रामाणिकपणे करून खासदार सुप्रिया सुळे यांना 70 हजारांपेक्षा जास्त मताधिक्‍य देण्यात सिंहाचा वाटा उचलला. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने इंदापूर विधानसभेची जागा सोडण्यास नकार दिल्याने पाटील यांनी भाजपची वाट धरली आहे.

मुंबईत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाटील भाजपचे कमळ हाती धरणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच पाटील यांनी इंदापूर शहरातील कॉंग्रेस कार्यालयातून कागदपत्रे व साहित्य हलविले होते. सध्या कॉंग्रेसमध्ये असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते पाटील यांचे कट्टर समर्थक असल्याने पाटील यांच्यासोबतच भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यातून कॉंग्रेसचा पंजा हद्दपार होण्याची शक्‍यता आहे. घड्याळाने त्यांनी आमदारकीची सुरवात त्यांनी केली. नंतर घड्याळाशी त्यांचे संबंध हे नेहमीच कधी मैत्रीचे तर कधी स्पर्धेचे राहिले. आता घड्याळाने म्हणजे राष्ट्रवादीने त्यांना इंदापूर मतदारसंघ सोडला नसल्याचे सांगत हर्षवर्धन आता आपले काॅंग्रेसचे जुने घर सोडत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com