Harshwardhan Patil About MLA Resignation_Maratha Kranti Morch | Sarkarnama

राज्यात आमदारांच्या राजीनाम्याचे नाटक विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने सुरू : हर्षवर्धन पाटील

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

इंदापूर तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे या मागणी साठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाच्या ठिकाणी मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

इंदापूर : सध्या राज्यातील काही आमदारांनी राजीनामा देणे सत्र चालू केले आहे . मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचे नाटक करून आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्याला मराठा समाजाचा पाठिंबा मिळावा या हेतूने हे नाटक चालू केले असल्याचा आरोप माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.

इंदापूर तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे या मागणी साठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाच्या ठिकाणी मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, "आमदारकीचा राजीनामा नुसते विधानसभा अध्यक्षांना पत्र देवून चालत नाही. त्यासाठी विधी मंडळाने वीस नंबरचा फॉर्म तयार केला आहे. त्या फॉर्मवर राजीनामा द्यावा लागतो व नंतर तो मंजूर होतो. हे मी गेली वीस वर्षे संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केल्याने माहित आहे." विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची सहानुभूती मिळावी म्हणून काही आमदार राजीनाम्याचे नाटक करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

पाटील पुढे म्हणाले, "मागासवर्गीय आयोगाकडे त्वरित मराठा आरक्षणाचा अहवाल द्या अशी मागणी करण्यासाठी काल विनोद तावडे यांचे अध्यक्षतेखाली काल समिती नियुक्त केली आहे. गेल्या दोन चार वर्षापूर्वी का समिती स्थापन केली नाही, हा प्रश्न आहे. आता उच्च न्यायालयाने सरकारला मराठा आरक्षणा बद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिल्यावर ते मागासवर्गीय आयोगाला विनंती करू लागले आहेत," चार वर्षे त्यांनी आयोगाकडे अहवाल देण्याची मागणी का केली नाही असा सवाल करून पाटील म्हणाले, याचा अर्थ त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू नये असा निघतो. 

                      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख