कन्नडमधून जाधवशाही संपली, शिवसेनेच्या राजपूत यांचा उदय

कन्नडमधून जाधवशाही संपली, शिवसेनेच्या राजपूत यांचा  उदय

औरंगाबादः राज्याचे लक्ष लागून असलेल्या आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कन्नड-सोयगांव मतदारसंघात अखेर शिवसेनेनेन हर्षवर्धन यांचा पराभव करत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले.

गेल्या दोन निवडणुकीत जाधव मनसे आणि शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. यावेळी मात्र शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी जाधव यांच्यावर 18660 मतांनी दणदणीत विजय मिळवला. कन्नडमधून जाधवशाही संपवत शिवसेनेच्या राजपूत यांच्या विजयाचा खऱ्या अर्थाने "उदय' झाल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. राजपूत यांना 79107 तर अपक्ष जाधव यांना 60447 मते मिळाली.

कन्नड मतदारसंघ राज्यभरात चर्चेला आला तो अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांना उद्देशून केलेल्या असभ्य विधानामुळे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या जखमा शिवसैनिकांच्या मनात ताज्या असतांनाच जाधव यांनी ऐन निवडणुकीच्यावेळी शिवसैनिकांना डिवचले आणि त्याची किंमत जाधव यांना पराभवाने चुकवावी लागली.

शिवसेनेचे उदयसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे, अपक्ष हर्षवर्धन जाधव, भाजप बंडखोर किशोर पवार यांच्यासह वंचित आघाडीचा उमेदवार देखील रिंगणात होता. मात्र खरी लढत राजपूत व जाधव यांच्यातच होती. मतदारसंघातून अनेक इच्छूक असतांना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उदयसिंग राजपूत यांच्यासाठी प्रतिष्ठापणाला लावत उमेदवारी आणली. त्यांची निवड योग्य होती हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्या पराभवासाठी तालुक्‍यातील शिवसैनिक अक्षरशा पेटून उठले होते. त्यात जाधव यांनी उध्दव ठाकरे व शिवसैनिकांविरूध्द खालच्या पातळीवर जाऊन विधान केले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाधव यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जाधव यांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करायचे या जिद्दीने आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवत शिवसैनिकांनी काम केले आणि उदयसिंग राजपूत यांना निवडूण आणले. राष्ट्रवादीकडून मैदानात उतरलेल्या संतोष कोल्हे यांनी 43614 मते घेतली, ते तिसऱ्या क्रमाकांवर राहिले.

जाधवांनी घेतला काढता पाय..

सकाळी मतमोजणी केंद्रावर आलेले हर्षवर्धन जाधव शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांची आघाडी दहा हजारांच्यावर गेल्यावर मतदान केंद्र सोडले. आपला पराभव होणार याची खात्री झाल्यावर त्यांनी मतदान केंद्राबाहेर येऊन पराभव मान्य करत नवीन आमदारांना शुभेच्छा देखील दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com