'राष्ट्रवादी' प्रवेश नाही; हर्षवर्धन जाधव स्वतंत्र लढणार!

एमआयएम किंवा इतर कुठल्याही पक्षाबरोबर युती करण्याचा आपला विचार नाही
'राष्ट्रवादी' प्रवेश नाही; हर्षवर्धन जाधव स्वतंत्र लढणार!

औरंगाबादः आगामी विधानसभा निवडणुकीत कुठल्यातरी राजकीय पक्षासोबत जावे असा मत प्रवाह काही कार्यकर्त्यांचा होता. त्यानूसार शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपशी आमची चर्चा सुरू होती. पण ज्या उद्देशाने मी स्वःताचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढला होता, तो बाजूला ठेवून राजकीय स्वार्थासाठी एखाद्या पक्षात जावे हे माझ्या मनाला पटत नव्हते. म्हणून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य बहुजन पक्ष उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली.

हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर जाधव यांनी सायंकाळी पत्रकार परिषद बोलावल्याने ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. हर्षवर्धन जाधव म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने मला 2 लाख 83 हजार इतके भरभरून मतदान केले. एखाद्या अपक्ष उमेदवाराला एवढी मते मिळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. लोकसभा निवडणुकीनंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपण एखाद्या राजकीय पक्षाच्या सोबत गेलं पाहिजे अशी इच्छा पक्षातील कार्यकर्त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली होती.

त्यानूसार राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षाशी आमचे पदाधिकारी चर्चा करत होते. परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी पक्ष स्थापनेच्या हेतूला हरताळ फासून एखाद्या पक्षात जावे हे माझ्या मनाला पटले नाही. शिवाय लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात मला मिळालेली मते पाहता आमच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत निश्‍चित यश मिळेल अशी मला खात्री असल्याचे जाधव यांनी सांगितले.

गंगापूर-खुल्ताबाद, वैजापूर, कन्नड आणि शहरी भागातील पुर्व, मध्य, पश्‍चिम या सर्व विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मला लक्षवेधी मते मिळाली होती. गंगापूर-खुल्ताबादमध्ये तर सध्याच्या आमदारांना तेव्हा जितकी मते मिळाली होती, त्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील किमान चार मतदारसंघात माझ्या पक्षाच्या उमेदवारांना यश मिळेल असे मला वाटते. त्यामुळे एमआयएम किंवा इतर कुठल्याही पक्षाबरोबर युती करण्याचा आपला विचार नाही असेही हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com