harshwardhan jadhav and udyan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

हर्षवर्धन जाधवांच्या आग्रहास्तव उदयनराजेंची कन्नडवर स्वारी !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

यापुर्वी देखील कहाळा गावातील रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जाधव यांनी सत्तार, कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य सुभाष झांबड यांना आमंत्रित करून पक्षनेतृत्वाला इशारा दिला होता. पण शिवसेनेने त्याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले. त्यामुळे हर्षवर्धन यांनी कॉंग्रेसला जवळ करत आपली राजकीय वाटचाल काय असेल हे कृतीतून दाखवून दिले आहे.

औरंगाबाद : "मी माझ्या मतदारसंघातला छोटा उदयनराजेच आहे' अस स्वतःला म्हणवून घेणारे कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर मतदारसंघातील लोकांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. मुस्लिम समाजासाठींच्या कब्रस्तान व इदगाह मैदानासाठीच्या पाच एकर जागेचा सातबारा देण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी थेट सातारचे खासदार व राष्ट्रवादीचे नेते उदयनराजेंना आमंत्रित केले आहे. उद्या (ता. 15) शुक्रवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भासले यांच्या हस्ते मुस्लिम कमिटीला कब्रस्तान व इदगाह मैदानसाठीच्या जागेचा सातबारा देण्यात येणार आहे. या निमित्ताने छोट्या उदयनराजेंच्या मतदारसंघात मोठे उदयनराजे आल्याची चर्चा कन्नडमध्ये रंगली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत बैठका असो की पक्षाचा मेळावा, कार्यक्रम. याकडे कधीही न फिरकणारे तरीही शिवसेनेत असलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर खासदार निधी हडपल्याचा आरोप आणि पुरावे देऊनही पक्ष त्यांच्यावर काहीच कारवाई करत नसल्याचा राग हर्षवर्धन जाधव यांना आहे. 

पक्षात राहूनच विरोधी पक्षाच्या नेत्यांना मतदारसंघातील विकासकामांच्या उद्‌घाटनाला बोलावण्याचा सपाटा जाधव यांनी लावला आहे. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलतांना हर्षवर्धन जाधव यांनी "माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप केलेला मला चालणार नाही, मग मला कुणी सणकी म्हणो किंवा काहीही म्हणो, मी माझ्या मतदारसंघातला उदयनराजेच आहे' असे अभिमानाने सांगितले होते. कन्नड मतदारसंघातील एका सभागृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलतांना कब्रस्तान व इदगाह मैदानाच्या जागेचे लोकार्पण करण्यासाठी आपण खासदार उदयनराजे भोसलेंना आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार उद्या उदयनराजे भोसले कन्नडमध्ये येत आहेत. 

प्रमुख पाहुणे कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार 
शिवसेना आमदाराच्या मतदारसंघातील या कार्यक्रमाला शिवसेनेच्या एकाही स्थानिक अथवा राज्य पातळीवरील नेत्याला आमंत्रित करण्यात आलेले नाही. प्रमुख उपस्थित म्हणून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत. यावरून शिवसेना आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील संबंध किती ताणले गेले आहेत हे स्पष्ट होते. यापुर्वी देखील कहाळा गावातील रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जाधव यांनी सत्तार, कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य सुभाष झांबड यांना आमंत्रित करून पक्षनेतृत्वाला इशारा दिला होता. पण शिवसेनेने त्याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले. त्यामुळे हर्षवर्धन यांनी कॉंग्रेसला जवळ करत आपली राजकीय वाटचाल काय असेल हे कृतीतून दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात नव्हते, तर त्यांनी रायगडावर मशीद बांधत एकात्मतेचे दर्शन घडवले होते याचा दाखला देणारी जाहिरात हर्षवर्धन जाधव यांनी स्थानिक वृत्तपत्रांमधून आज प्रसिध्दीस दिली आहे. या कामासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपतींच्या भोसले घराण्याचे 13 वे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांना इदगाह व कब्रस्तानसाठीच्या जागेचा सातबारा देण्यासाठी आवर्जून बोलावल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख