लोकसभा निवडणूकीत प्रस्थापितांना मी धक्का देणार - हर्षवर्धन जाधव

लोकसभा निवडणूकीत प्रस्थापितांना मी धक्का देणार - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार आणि तयारी मी सुरू केली आहे. शिवसेना, कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी सारख्या प्रस्थापित पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांशी माझी लढत होणार आहे. परंतु माझा पक्ष नवखा आहे म्हणून मला कुणी सहज घेऊ नये, मी या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देणारच असा दावा शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

र्लोकसभेच्या निवडणुका अवघ्या चार पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. युती, आघाडीच्या चर्चांचे फड रंगलेले असतांनाच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या विद्यमान शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याच पक्षाच्या सलग चारवेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. 

लोकसभा निवडणुकीची तयारी, सध्याचे राजकीय वातावरण आणि प्रस्थापित पक्षांचे आव्हान या संदर्भात भूमिका स्पष्ट करतांना हर्षवर्धन जाधव म्हणाले, लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे. मतदारसंघातील भेटीगाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सर्कलनिहाय सुरू केलेला माझा दौरा संपत आला आहे. दुसऱ्या टप्यात मी येत्या जानेवारीपासून शहरातील महापालिका वार्डनिहाय दौरा करणार आहे. 

ग्रामीण आणि शहरी भागांचे प्रश्‍न निराळे आहेत. शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नावर आवाज उठवत राजकीय इच्छाशक्ती असेल तर कुठलीही समस्या सुटू शकते ही मी कृतीतून दाखवून दिले होते. पण पुढे त्यात राजकारण आले आणि अजूनही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना हा प्रश्‍न सोडवता आलेला नाही. रस्ते, पाणी, वीज हे मुलभूत प्रश्‍न सोडवण्यात प्रस्थापित पक्ष कसे कमी पडले हेच मुद्दे मी माझ्या भेटीगाठीतून मांडणार आहे. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा ठरणार महत्वाचा.. 

मराठा, धनगर, मुस्लीम, कोळी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा आगामी निवडणूकीत महत्वाचा ठरणार आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन, त्यात गेलेले तरूणांचे बळी, राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिका या सगळ्याचा परिणाम आगामी निवडणूकीतील मतदानावर निश्‍चितच होणार आहे. तेव्हा कोण नवखा, त्याचा पक्ष किती जुना हे प्रश्‍न गौण ठरतील. 

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा मी दिला होता. राज्यभरात विशेषता मराठवाड्यात आरक्षणासाठी समाजाच्या तरुणांनी टोकाची भूमिका घेत केलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न केले. प्रस्थापित पक्ष आणि त्यांचे नेते, आमदार, खासदार मात्र तेव्हा लपून बसले होते. याचा राग समाज आणि जनतेच्या मनात आहे, तो मतांमधून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. 

त्यामुळे माझा पक्ष आणि लोकसभा निवडणूकीत मी नवखा असलो तरी महत्वाच्या विषयावर घेतलेल्या भूमिका, त्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न याची पावती मला निश्‍चित मिळेल अशी अपेक्षा देखील हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com