विक्रमी मताधिक्याने माझा विजय निश्चित : हर्षवर्धन

विक्रमी मताधिक्याने माझा विजय निश्चित : हर्षवर्धन

इंदापूर : राज्याच्या प्रगतीसाठी जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत प्रचंड मताधिक्‍याने विजयी करा असे आवाहन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा खासदार गिरीश बापट यांनी केले.
बावडा ( ता. इंदापूर ) येथे महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, प्रा. लक्ष्मण ढोबळे उपस्थित होते.

गिरीश बापट पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य असून मंत्री म्हणून काम करताना हर्षवर्धन पाटील यांनी 19 वर्ष विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. मात्र मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तालुक्याच्या विकासासाठी आमदार दत्तात्रय भरणे याना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने तेराशे कोटीचा निधी देण्यात आला. मात्र हा निधी व्यक्ती म्हणून आमदाराला न देता जनतेच्या विकासासाठी दिला. यामध्ये आमदार यांनी फक्त पोस्टमन म्हणून काम पाहिले असून ते लबाडांच्या टोळीत आहेत.

अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात बारामतीला सर्वाधिक निधी नेला व इतर तालुक्यावर अन्याय केला. त्यामुळे ते पालकमंत्री पेक्षा बालकमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सरकार त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री तसेच खासदार म्हणून मी हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व प्रश्न सुटणार असून राज्यात देखील ते हातभार लावतील. त्यामुळे इंदापूरसह जिल्ह्यात एखादी जागा वगळता सर्वत्र कमळ फुलणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील म्हणाले, तालुक्यातील जनतेच्या आग्रहास्तव आपण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेचच महायुतीचे टिकीट घोषित केले. त्यानंतर मुख्यमंत्री भिगवण येथे महाजनादेश यात्रेस आले असताना मी त्यांच्याकडे तालुक्यातील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना इंदापूर तालुक्यात पाणी देण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने इंदापूर तालुक्‍यात पाणी सोडून तलाव भरण्यात आले. लोकसभेत आम्ही आघाडी धर्माचे पालन करून 71000 मताचे लीड सुप्रिया सुळे यांना दिले. यासंदर्भात शरद पवार यांनी सोलापूर येथे भेटल्यानंतर विचारणा केली असता आम्ही त्यांना 45 ते 50 हजार मताधिक्य देऊ असे सांगितले होते. मात्र ज्यावेळी मतमोजणीनंतर ताईना 71000 लीड मिळाले. त्यावेळी आम्ही सांगताना कमी सांगतो मात्र देताना भरभरून देतो ही तालुक्याची संस्कृती आहे, असे पवार यांना सांगितले असता टाळ्यांचा कडकडाट झाला.

अजित पवार यांनी बावड्यात झालेल्या सभेत सर्वांना घड्याळाशेजारील बटन दाबण्याचे आवाहन केले मात्र शेजारी कमळ हे बटन आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मला विजयी करा असे आवाहन केले आहे. तसेच शरद पवार यांनी सांगता सभेत परिवर्तनास साथ द्या असे आवाहन केले. त्यामुळे इंदापूर तालुक्यात परिवर्तन अटळ असून माझा विजय विक्रमी मताधिक्‍याने निश्चित  आहे.

माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, ``हलगी हे आमच्या समाजाचे साधन असून मी हलगीच्या तालावर झेंडा घेऊन नाचलो अशी टीका अजित पवार यांनी माझ्यावर केली. मात्र त्यांच्यावर आई-वडिलांच्या संस्काराची कमी आहे  अशी खिल्ली त्यांनी उडवली. निवडून आल्यानंतर हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री होतील नंतर ते अजित पवार यांच्या 11 कारखाने जप्त करतील तसेच अटक ही करतील म्हणून त्यांचा आटापिटा चालू आहे. त्यामुळे ते हर्षवर्धन पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करत आहेत, जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी आप्पासाहेब जगदाळे, अशोक घोगरे, बाळासाहेब घोलप, संजय निंबाळकर, सुर्यकांत वाघमारे, मारुतीराव वनवे, विशाल बोंद्रे, बाबा- साहेब चौरे, नानासाहेब शेंडे, विलास वाघमोडे, नितीन शिंदे, कृष्णाजी यादव, युवराज पोळ आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक उदयसिंह पाटील तर सूत्रसंचालन कालिदास आव्हाड यांनी केले. आभार बाबासाहेब चौरे यांनी मानले. यावेळी पद्माताई भोसले, लालासाहेब पवार, उल्हास केसकर, उदयसिंह पाटील, भाऊसाहेब सपकळ, विजयसिंह निंबाळकर, युवराज मस्के, माऊली चौरे, श्रीमंत ढोले, रामवर्मा आसबे, राम आसबे, माऊली वाघमोडे उपस्थित होते. अपक्ष उमेदवार सुधीर पोळ व महादेव मोहिते यांनी हर्षवर्धन पाटील यांना जाहीर पाठींबा देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com