Harshawardhan Jadhav challenges Nandurbar Shivsena district in charge | Sarkarnama

नंदुरबारला निघालोय, बघु कुणात हिंमत आहे मराठा आंदोलन रोखायची ? : हर्षवर्धन जाधव 

जगदीश पानसरे 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

दुरबारला जाऊन मी आंदोलन करणार आहे, मलाही बघायचे कोणत्या पक्षात मराठा आंदोलन रोखण्याची हिमंत आहे ?

औरंगाबाद : " मराठा आरक्षणासाठी समाजाच्या भावना तीव्र आहेत, उद्या क्रांतीदिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. असे असतांना नंदुरबारचा कुणी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ' तुम्ही कसे आंदोलन करता हेच पाहतो' अशी भाषा वापरतो. हा प्रकार म्हणजे भडकवण्याचा प्रयत्न आहे आणि तो योग्य नाही. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी मी स्वःत नंदुरबारला जाताये, बघतो कुणाच्या आणि कोणत्या पक्षात हिमंत आहे मराठा आंदोलन रोखण्याची," असा दम शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भरला आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या (ता.9) क्रांतीदिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात तणावाचे वातावरण असतांना नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी मराठ्यांनी नंदुरबार बंद करून दाखवावेच असे जाहीर आव्हान देणारा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी फोनवरून संपर्क साधला असून नंदुरबारचे जे कोणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. शिवाय मी स्वतः नंदुरबारला निघालो आहे. 

माझ्या बरोबर जे येतील ते येतील नाही तर मी एकटाच त्यांना जाब विचारणार आहे. मराठा आंदोलनाच्या विरोधात शिवसेना अशी भूमिका कशी घेऊ शकते. त्यामुळे नंदुरबारला जाऊन मी आंदोलन करणार आहे, मलाही बघायचे कोणत्या पक्षात मराठा आंदोलन रोखण्याची हिमंत आहे ,असा इशारा देखील हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख