हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादीच्या वाटेवर ? संध्याकाळी गुढ उलगडणार का ?

हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादीच्या वाटेवर ? संध्याकाळी गुढ उलगडणार का ?

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून कळते. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या अटीवर जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे समजते. यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली आहे 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करत हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी घेतलेल्या 2 लाख 84 हजार मतांमुळे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. जाधव यांच्या बंडखोरीने गेल्या पंचवीस वर्षापासून अबाधित असलेला शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला. मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाल्यामुळे अनपेक्षितपणे एमआयएमचे इम्तियाज जलील औरंगाबादमधून विजयी झाले. 

शिवसेनेच्या पराभवाला हर्षवर्धन जाधव हे जबाबदार असल्याची भावना जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिकांची झाली. त्यामुळे या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत जाधव यांना पराभूत करून काढण्याची जोरदार तयारी शिवसैनिकांनी सुरू केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांना मराठा समाजाची भरभरून मते मिळाली. परंतु विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांना कुठल्याच पक्षाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. 

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी असलेली मैत्री कामाला येऊन वंचित बहुजन आघाडी कडून विधानसभा लढवता येईल असा पर्यायही जाधव यांनी चाचपून पाहिला होता अशी देखील चर्चा आहे.परंतु एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतच बिघाडी झाल्यामुळे जाधव यांचे प्रयत्न अपयशी ठरले. शिवसेनेकडून जोरदार प्रतिकार होणार हे लक्षात घेऊन हर्षवर्धन जाधव नव्या पक्षाच्या शोधात होते. त्यांचा हा शोध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षापाशी येऊन थांबल्याचे दिसते. एकीकडे राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्ह्यातील अवस्था फारशी चांगली नसली तरी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदार संघ आणि वैजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीला प्रतिनिधित्व आहे. भाजपच्या मेगाभरती रोज एक नेता राष्ट्रवादीतून जात असल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचा पक्षात होणारा प्रवेश राष्ट्रवादीसाठी देखील जिल्ह्यात फायद्याचा ठरू शकतो अशी चर्चा आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला अजित पवार, धनंजय मुंडे यांनी संमती दर्शवली असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या होकारानंतर जाधव आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधतील अशी जोरदार चर्चा जिल्ह्यामध्ये आहे . 

आत्ताच काही सांगणार नाही - जाधव 
यासंदर्भात हर्षवर्धन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण सायंकाळी पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्यावेळी काय निर्णय आहे तो जाहीर करू असे सांगितले. माझ्या काही वाटाघाटी आणि बोलणे सुरू आहे, त्यामुळे आत्ताच काही सांगता येणार नाही असे म्हणत या विषयावर अधिक बोलणे टाळले . 

मुंडे-जाधव भेट झाली - चिकटगावकर 
राष्ट्रवादीच्या जिल्हा ग्रामीणचे कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांनी हर्षवर्धन जाधव आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचे मान्य केले. परंतु जाधव यांच्या पक्षप्रवेश याविषयी आपल्याला अधिक काही माहिती नसल्याचे सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com