हर्ष पोद्दार : लंडनचे कॉर्पोरेट बॅरीस्टर ते बीडचे पोलिस अधीक्षक - Harsh Poddar : barrister in London to IPS officer journey | Politics Marathi News - Sarkarnama

हर्ष पोद्दार : लंडनचे कॉर्पोरेट बॅरीस्टर ते बीडचे पोलिस अधीक्षक

दत्ता देशमुख 
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा कसा अभ्यास करता याला महत्व आहे. कमी वेळ पण एकचित्ताने अभ्यास करा. समस्यांच्या गर्तेत, चिंतेत राहण्याऐवजी त्यावर मात करण्याचा ध्यास घ्या. मनाला कायम आनंदी ठेवून अभ्यास केला तर यश निश्चित मिळते.
- हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक, बीड.

-नॅशनल लॉ स्कुलच्या प्रवेशपूर्व परीक्षेत देशात सहावा रँक.

- ब्रिटीश चीव्हनिंग स्कॉलरशिपवर इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठात कायद्याचे पदव्युत्तर पदवी शिक्षण.

- जगातील नामांकित ‘क्लिफर्ड चान्स’ या कॉपोटर्रेट लॉ फर्म मध्ये बॅरीस्टर म्हणून काम.

- वर्षाकाठी साधारण सव्वा कोटी रुपयांची कमाई होती.

- समाजासाठी काम करता यावे यासाठी सोडली परदेशातील नोकरी.

- ‘युपीएससी’च्या  परीक्षेत ३६० व्या रँकसह यशस्वी 

- प्रशिक्षण काळात आठ पुरस्कारांचे मानकरी.

बीड : हर्ष पोद्दार हे मुळ बिहारचे. ज्योत्सना व विश्वनाथ पोद्दार या व्यवसायिक दाम्पत्याचे एकुलते एक असलेल्या हर्ष पोद्दार यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पोद्दार कुटूंबिय कोलकत्ता येथे स्थायिक झाले. 

वडिलांच्या बरोबरीने व्यवसात मदत करणाऱ्या आईचा हर्ष पोद्दार यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. 

कोलकत्ता येथील नॅशनल स्कुलमध्ये प्रवेशासाठी दिलेल्या पूर्व परीक्षेतही देशातून त्यांनी सहावी रँक मिळविली. कायद्याचे शिक्षण घेताना त्यांचा अश्वारोहण , वादविवाद- वक्तृत्व स्पर्धात   त्यांचा दबदबा होता. 

अंतरराष्ट्रीय पातळीवरील साधारण आठ ते दहा स्पर्धांत सहभाग घेणाऱ्या हर्ष पोद्दार यांनी एका जागतिक वाद - विवाद स्पर्धेत दक्षिण आशियातून सर्वोच्च रँक मिळविला. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये शोध प्रबंधही सादर केला.

सामाजिक कामाची आवड असलेल्या हर्ष पोद्दार यांनी क्रया या संस्थेसोबत बाल कामगारांसाठी काम केले. पैशाच्या जोरावर परदेशात शिक्षण घेणारे अनेक असतात. परंतु, त्यांना युके आणि युएसए मधील १३ महाविद्यालयांकडून पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा अशा ऑफर होत्या.

दरम्यान, पाच वर्षांचे कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इंग्लंड मधील ऑक्स्फर्ड विद्यापीठाची निवड केली. विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण ब्रिटीश चीव्हनिंग स्कॉलरशिप शिष्यवृत्तीतून पूर्ण झाले.

जगातील नामांकित क्लिफर्ड चान्स या कॉर्पोरेट लॉ फर्ममध्ये हर्ष पोद्दार बॅरीस्टर होते. दिड वर्षे त्यांनी कॉर्पोरेट बॅरीस्टर म्हणून काम केले. महिन्याकाठी साधारण किमान दहा लाखांची त्यांची कमाई होती.

 परंतु, आपले शिक्षण समाजाच्या कामाला येत नसल्याने त्यांचे मन बोचत होते. समाजासाठी काही करायचे तर पोलिस सेवेतील नोकरी करण्याचा सल्ला त्यांना प्रोफेसर जेफ किंग यांनी दिला. त्यामुळे त्यांनी युपीएससी करण्याचा निर्णय घेतला.

मुलाखतील देशात प्रथम

 दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलिस सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी २०११ च्या मध्यंतरात भारतातून पुस्तके मागवून घेऊन इंग्लंडमध्येच अभ्यासाला सुरुवात केली. तसे कायद्याचे शिक्षण झाल्याने त्यांचा पाया पक्का होताच. २०११ च्या शेवटी त्यांनी क्लिफर्ड चान्स लॉ फर्म सोडले. त्यानंतर दिडच महिन्यात झालेल्या युपीएससीच्या पूर्व परीक्षेतही ते उत्तीर्ण झाले.मुलाखतीत देशात प्रथम येणाऱ्या हर्ष पोद्दार यांना ३६० वा रँक मिळाला.

२०१२ मध्ये पुर्व परीक्षा झाल्यानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याचा मोठा धक्का त्यांना बसला. हाताश झालेल्या हर्ष पोद्दार यांनी समस्येला हरविण्याचा चंग बांधत या धक्क्यातून स्वत:ला सावरत अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. मुख्य परीक्षेत यश मिळविल्यानंतर मुलाखतीत ते देशात प्रथम आले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख