"जनतेला हार्दिक पटेलची नव्हे, विकासाची सीडी बघायचीय" - Haridik Patel Criticises BJP over CD | Politics Marathi News - Sarkarnama

"जनतेला हार्दिक पटेलची नव्हे, विकासाची सीडी बघायचीय"

वृत्तसंस्था
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

अहमदाबाद : गुजरातची जनता 22 वर्षांच्या तरुणाची सीडी नव्हे, तर 22 वर्षांत गुजरातमध्ये काय विकास झाला याची सीडी पाहू इच्छित आहे, असे म्हणत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने भारतीय जनता पक्षावर जोरदार पलटवार केला आहे.

अहमदाबाद : गुजरातची जनता 22 वर्षांच्या तरुणाची सीडी नव्हे, तर 22 वर्षांत गुजरातमध्ये काय विकास झाला याची सीडी पाहू इच्छित आहे, असे म्हणत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने भारतीय जनता पक्षावर जोरदार पलटवार केला आहे.

हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांकडून त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष उभा करणारा हार्दिक पटेलची लोकप्रियता वाढत आहे. ही लोकप्रियता भाजपची डोकेदुखी ठरत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यावर भाजपकडून हार्दिकवर जोरदार टीका केली जात आहे.

हार्दिकच्या समर्थनार्थ गुजरातमधील दलित समाजाचा नेता जिग्नेश मेवानी पुढे आला आहे. ''सेक्स हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणालाही तुमच्या व्यक्तिगत बाबींचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही" असे ट्विट त्याने केले.

हार्दिकने काल (मंगळवार) भरूच जिल्ह्यामधील गावांमध्ये आरक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना तो म्हणाला, "चला, असं मानू या मी चुकलो आहे. तुम्हाला संधी मिळाली तर मला मारा, मात्र हा मुद्दा आपल्या समाजाच्या अधिकारांचा आहे. मुद्दा शेतकरी आणि युवकांच्या भविष्याचा आहे. या मुद्द्यांवर भाजप सरकार काहीच का बोलत नाही?" असा सवाल त्याने उपस्थित केला.

ज्याला जे करायचं ते करा, मी मागे हटणार नाही. आणखी त्वेषाने लढणारा मी आहे. 23 वर्षांचा हार्दिक आता मोठा होत आहे. मला बदनाम करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.

 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख