haribhau bagade reaches on two wheeler for accepting resignation | Sarkarnama

भास्कररावांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी हरिभाऊ बागडे चक्क टू व्हिलवरवर

माधव सावरगावे
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे चक्क मोटार सायकलवर बसून आले. अवघ्या पाच मिनिटांत भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारून शिवसेनेत जाण्याचा त्यांचा मार्ग हरिभाऊ नानांनी मोकळा केला.

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे चक्क मोटार सायकलवर बसून आले. अवघ्या पाच मिनिटांत भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारून शिवसेनेत जाण्याचा त्यांचा मार्ग हरिभाऊ नानांनी मोकळा केला.

जाधव हे आज सकाळी विशेष विमानाने मुंबईहुन औरंगाबादला आले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अनिल परब हे होते. औरंगाबाद विमानतळावर आल्यानंतर त्यांच्यासोबत आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे हे होते. विमानतळावर आल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी त्यांना औरंगाबादजवळ असलेल्या कुंभेफळ येण्याचा निरोप दिला. त्यानंतर एका खासगी कार्यालयात शिवसेनेचे सर्व नेते पोहचले होते. मात्र, हरिभाऊ बागडे यांना त्याठिकाणी पोहचण्यास उशीर झाला.

नेमके त्याचवेळी जालना रोड ते कुंभेफळ या मार्गावरील रेल्वे फाटक रेल्वे येणार असल्याने बंद झाले होते. तेव्हा हरिभाऊ बागडे यांनी रेल्वे फाटक उघडण्याची वाट न पाहता कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवर राजीनामा घेण्याच्या जागेवर पोहचले. शेंद्राजवळील कुंभेफळ गावाकडे जाणाऱ्या एका कार्यालयात  बागडे यांच्याकडे भास्कर जाधव यांचा आपला राजीनामा सुपूर्त केला.

विशेष म्हणजे भास्कर जाधव यांना हरिभाऊ बागडे यांनी 'तुम्हाला उशीर होईल म्हणून मी लवकर आलो' म्हणायला विसरले नाहीत. बागडे हे आज सकाळपासूनच त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भागांमध्ये फिरत होते. सकाळी त्यांचे तीन कार्यक्रम होते तर दुपारी १२ वाजेपर्यंत बीडमधील एका नियोजित कार्यक्रमाला त्यांना पोहचयाचे होते. या सगळ्या घाईगडबडीत भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर जाधव लगेच आलेल्या विशेष विमानाने ते मुंबईकडे रवाना झाले. आज दुपारी ते आपल्या हातात पुन्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेणार आहेत. मात्र, हरिभाऊ बागडे यांच्या तत्परतेची आज चर्चा सुरू होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख