बाळासाहेबांच्या मंत्रिपदाचा मलाही आनंद : मकरंद पाटील  

आमदार बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादीतर्फे येथील राष्ट्रवादी भवनात त्यांचा सत्कार करण्यात आला.
Happy To See Balasaheb Patil As Minister Say Makrand Patil
Happy To See Balasaheb Patil As Minister Say Makrand Patil

सातारा : भाजपने मस्तीचे राजकारण केल्याने त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन पक्षांनी एकत्रितपणे सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचे काम करायचे आहे. सर्वपक्षीय लोकांच्या सहकार्यामुळेच मला मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली. आता शरद पवार जे मंत्रिपद देतील, त्याला न्याय देण्याचे काम आगामी काळात केले जाईल, अशी ग्वाही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

दरम्यान, जिल्ह्यातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवत विकासासाठी बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. आमदार बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादीतर्फे येथील राष्ट्रवादी भवनात त्यांचा सत्कार करण्यात आला. 

या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील, कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामराजे म्हणाले, "मी व श्री. शिंदे मंत्री असताना पक्षाची ताकद टिकविण्याचे काम आम्ही केले. बोलविल्याशिवाय आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमालाही जात नव्हतो. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. बाळासाहेब अतिशय शिस्तप्रिय असल्याने मीही शिस्त पाळण्याचा प्रयत्न करतोय.''

बाळासाहेब पाटील म्हणाले, "मस्तीचे राजकारण करणाऱ्या भाजपविषयी सर्वसामान्यांत चीड होती. त्यांनी शिवसेनेला दिलेला शब्दही पाळला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर अनेक संकटे आली; पण एक, दुसरा नेता सोडला तर इतर कोणीही पवारांची साथ सोडली नाही. शरद पवार यांनी माझ्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. मी शांत, संयमी असे तुम्ही म्हणता ते खरे आहे; पण सह्याद्री साखर कारखान्यावर जाऊन पाहा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याचे काम मी केले आहे, तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवरही वचक ठेवला जाईल.''

बाळासाहेब पाटील हे भावी पालकमंत्री आहेत, असे नरेंद्र पाटील यांनी म्हणताच भवनात टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या. ते म्हणाले, "आपण सर्वांनी तळागाळातील भांडणे मिटवून एकत्र राहिले पाहिजे. गेल्या पाच वर्षांत भाजपने शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचारी कारभार केला. आता अशा अधिकाऱ्यांची मस्ती उतरविण्याचे काम झाले पाहिजे. एखादे काम झाले नाही तरी चालेल; पण महाविकास आघाडीतील कार्यकर्त्याला शासन दरबारी सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे.'' या वेळी प्रभाकर देशमुख, दीपक चव्हाण यांचीही भाषणे झाली.

मकरंद पाटील म्हणाले, की मंत्रिपदामुळे कऱ्हाडकरांचे स्वप्न साकार झाले आहे. बाळासाहेब पाटील साधा, सरळ माणूस असून, ते फार कमी पण मुद्द्याचे बोलतात; पण आता हे चालणार नाही. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊन त्यांना काम करायचे आहे. तुम्हाला सहकार आणि पणनमंत्री पद मिळणार आहे, असे भाकित करून ते म्हणाले, "कारखाना कसा चालवावा याचे कसब त्यांच्याकडे आहे. काही मंडळींनी उच्च दराच्या घोषणा केल्या; पण प्रत्यक्षात सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून बाळासाहेबांनीच ते करून दाखविले. ज्येष्ठ असल्याने बाळासाहेबांचा मंत्रिपदावर अधिकार होता. मीही रेसमध्ये होतो; पण बाळासाहेबांना मंत्रिपद मिळाले याचा त्यांच्या बरोबरीने मलाही आनंद आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com