केळी संशोधनासाठी लवकरच विकास महामंडळ : गुलाबराव पाटील

.......
केळी संशोधनासाठी लवकरच विकास महामंडळ : गुलाबराव पाटील

जळगाव : जळगाव जिल्हा सर्वाधिक केळी लागवडीचे क्षेत्र आहे. त्याच्या विकासासाठी जिल्ह्यात लवकरच केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत केळी संशोधन केंद्र जळगाव येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंचची सभा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

यावेळी संशोधन केंद्राचे डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. व्ही. डी. शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी संभाजी ठाकूर, के. बी. पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कुठलेही काम करताना समाजसेवेचे व्रत म्हणून केल्यास लाभ होतो. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना याच भावनेतून मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांची शेती फायद्यात येण्यासाठी व अधिक उत्पादनासाठी त्यांना आधुनिक तत्रंज्ञानाची माहिती द्यावी. केळी संशोधन केंद्राचे बळकटीकरण व विस्तारीकरणासाठी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत बैठक घेऊन केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. 

यावेळी बोलताना शेतीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील म्हणाले, की जिल्ह्याचा दोन हजार कोटी रुपयांचा व्यापार हा केळी पिकावर अवंलबून आहे. केळी पिकावर येणाऱ्या रोगाचे निदान करण्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा (पॅथॉलॉजी लॅब) या केंद्रात असणे आवश्‍यक आहे. कृषी उपसंचालक अनिल भोकरे म्हणाले, जिल्ह्याचा विकास दर वाढविण्याकरिता केळी व कापूस पिकांचे महत्त्वाचे स्थान आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा अधिकाधिक विकास होण्यासाठी सर्व केळी उत्पादक एकाच छताखाली आणणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात केळी विकास महामंडळ स्थापन होणे आवश्‍यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

वडोदा (ता. चोपडा) येथील निर्यातक्षम केळी उत्पादक संदीप सुभाष पाटील म्हणाले, जे शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादन करतात त्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान मिळावे. तसेच केळीच्या रोपांची किंमत कमी व्हावी. त्याच बरोबर शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा. प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केळी संशोधन केंद्रातील केळी पिकाची पाहणी केली. तसेच अनुसूचित जाती जमाती (विशेष घटक योजनेअंतर्गत ) शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केळी संशोधन केंद्राचे प्रा. एन. बी. शेख यांनी केळी संशोधन केंद्राबाबत संगणकीय सादरीकरण केले, किरण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी नाबार्डचे जिल्हा समन्वय श्रीकांत झांबरे, केळी उत्पादक शेतकरी प्रशांत महाजन, केळी संशोधन केंद्र कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com