gulabrao-gawande-memories-sharad-pawar | Sarkarnama

`अन्‌ पवार साहेबांनी हात दाखविताच मैदानावर शांतता पसरली' 

गुलाबराव गावंडे, माजी राज्यमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मैदानावर वाढता गोंधळ लक्षात घेता ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार साहेब स्टेजवरून उठले आणि त्यांनी प्रेक्षकांना हात दाखवित शांत राहण्याचे आवाहन केले. पवार साहेबांच्या आवाहनाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आणि काही क्षणातच मैदानावर शांतता पसरली.

अकोला : ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनतर्फे 1978 मध्ये सांगली येथे झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान अशा सामन्यात मैदानावरील स्टेज वरून मोठा गदारोळ झाला होता. प्रक्षेकांनी खुर्च्यांची फेकाफेक सुरू केली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी प्रेक्षकांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, प्रेक्षक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मैदानावर वाढता गोंधळ लक्षात घेता ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार साहेब स्टेजवरून उठले आणि त्यांनी प्रेक्षकांना हात दाखवित शांत राहण्याचे आवाहन केले. पवार साहेबांच्या आवाहनाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आणि काही क्षणातच मैदानावर शांतता पसरली. पवार साहेबांची ही किमया जवळून पाहण्याचा योग आला आणि त्या क्षणापासूनच मी पवार साहेबांचा फॅन झालो. 

बहुदा माणसं पदांमुळे मोठी होताना आपण बघतो. त्यामुळेच त्यांची ओळखही निर्माण होत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. परंतु, एखाद्याने पदावर विराजमान झाल्यानंतर त्या पदाची गरिमा उंचावून ते पद मोठे केल्याचे, पदाचा सन्मान वाढविल्याचे सहसा दृष्टिपथास येत नाही. शरद पवार साहेबांनी मात्र हे सिद्ध केले आहे. देशाच्या राजकीय पटलावर शरद पवार हे नावं मोठ्या आदराने घेतले जाते. अत्यंत अभ्यासू, महत्वाकांक्षी, स्पष्टवक्ता आणि तितकाच हळव्या मनाचा माणूस असेच शरद पवार साहेबांच्या स्वभावाचे वर्णन करता येईल. प्रतिकुलतेकडून अनुकूलतेकडे समर्थपणे कुच करण्यासाठी सतत धडपड करणाऱ्या पवार साहेबांच्या स्वभावातील सर्वाधिक प्रभावशाली पैलू म्हणजे त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोन हा आहे. सतत नावीन्यपूर्ण कल्पना सुचत असलेल्या पवार साहेबांची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक असल्यामुळेच त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला वेगळेच बळ प्राप्त होते. 

1978 च्या दरम्यान पवार साहेबांच्या मी संपर्कात आलो. सांगली येथे कबड्डीचे सामने भरविण्यात आले होते. त्यावेळी बांग्लादेश, पाकीस्तान संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. या सामन्यात मैदानावरील स्टेज वरून प्रेक्षकांनी गोंधळ घातला. खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली. पोलिसांनी प्रेक्षकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही प्रेक्षक जुमानत नव्हते. मैदानावरील गोंधळ पाहून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी प्रेक्षकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचेही कोन्ही ऐकत नव्हते. शेवटी शरद पवार साहेब स्टेजवरून उठले आणि त्यांनी प्रेक्षकांकडे हात दाखवित शांत राहण्याचे आवाहन केले. अन्‌ काही क्षणात गोंधळ शांत झाला. पवार साहेबांची ही किमया जवळून पाहिली अन्‌ त्या क्षणापासूनच मी त्यांचा फॅन झालो. 

अखिल भारतीय कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष झाल्यावर पवार साहेबांशी सातत्याने संपर्क येत होता. सहा वेळा नॅशनल गेम खेळल्यावर कब्बडी संघाचा कॅप्टन झालो. मी छत्रपती पुरस्कारासाठी अर्ज केला. पवार साहेबांना भेटून शिफारस करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनीही मदत केलीही, पण पुरस्कार काही मिळाला नाही. त्यामुळे थोडासा नाराज होतो. पवार साहेबांच्या भेटीत त्यांनी ते ओळखलं होते. तेव्हा गुलाबराव नाराज होऊ नका, तुम्ही कबड्डीचे मैदान अनेकदा गाजविले आहे. आता राजकारणाचेही मैदान गाजवा. एक दिवस तुम्हीच पुरस्कार वितरण कराल असे म्हणत त्यांनी धीर दिला. काही वर्षानंतर आमदार झालो. आणि भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये मला क्रीडा राज्यमंत्री पद मिळाल्यावर माझ्या हस्ते छत्रपती पुरस्कार वितरणाचा योग आला. तेव्हा पवार साहेबांचे ते शब्द आठवले. 

पवार साहेबांनी कधी हा अमुक पक्षाचा, तो तमुक पक्षाचा म्हणून परकी वागणूक दिली नाही. माणूस ओळखण्याची आणि जोडून ठेवण्याची कला पवार साहेबांच्या अंगी आहे. शिवसेनेत असताना पक्षातील कुटील राजकारणाचा मी बळी ठरलो. उद्धव ठाकरे यांच्या अवती-भोवती असलेल्या चौकडीमुळे अनेक निष्ठावंत शिवसेनेपासून दुरावले गेलेत. मी सुद्धा त्यातील एक. मात्र, अशा कठीण प्रसंगी पवार साहेबांनी माझ्यावरील प्रेम कायम ठेवत त्यांनी दिलेली छत्रछाया आजही कायम आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची जाण असणारा नेता म्हणजे पवार साहेब आहेत. आज देशाच्या राजकीय क्षेत्रात अनेक नेते आपल्या कर्तृत्व गाजवून गेले व गाजवत आहेत. मात्र, शरद पवार साहेब यांच्या सारखा दुसरा द्रष्टा नेता नाही. वाढदिवसानिमित्त पवार साहेबांना खूप खूप शुभेच्छा! 
(शब्दांकन : श्रीकांत पाचकवडे, अकोला)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख