गुजरातमधील भाजप नाराजांवर 'मराठी' हेरगिरी - Gujrat Elections BJP to take help of Maharashtra Leaders | Politics Marathi News - Sarkarnama

गुजरातमधील भाजप नाराजांवर 'मराठी' हेरगिरी

संपत देवगिरे
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

गुजरात विधानसभे निवडणुकीसाठी भाजपने एक विशेष पॅटर्न तयार केला आहे. निवडणुकीसाठी मतदारसंघ, मतदान केंद्र आणि मतदारयादीचे प्रत्येक पान अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये भाजपचे जे कार्यकर्ते नाराज अथवा निष्क्रीय असतील त्यांची गुप्तपणे माहिती संकलीत करण्याचे काम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर सोपविले आहे. या नाराजांची नावे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला कळवुन मनोमिलन घडविले जाईल.

नाशिक : गुजरात विधानसभे निवडणुकीसाठी भाजपने एक विशेष पॅटर्न तयार केला आहे. निवडणुकीसाठी मतदारसंघ, मतदान केंद्र आणि मतदारयादीचे प्रत्येक पान अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये भाजपचे जे कार्यकर्ते नाराज अथवा निष्क्रीय असतील त्यांची गुप्तपणे माहिती संकलीत करण्याचे काम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर सोपविले आहे. या नाराजांची नावे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला कळवुन मनोमिलन घडविले जाईल.

गुजरात निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील भवितव्य ठरविणार आहे. त्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणुक कौशल्याचीही परिक्षा आहे. त्यामुळे ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने त्यासाठी स्वतः अमित शहा यांनी लक्ष घालुन त्रिस्तरीय संपर्क यंत्रणा निर्माण केली आहे. यासंदर्भात रविवारी नवसारी येथे शहा व राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीष यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

गुजरातच्या यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी नाशिकचे लक्ष्मण सावजी यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, नाशिकचे अविनाश पाटील, विपुल लोढा, मुंबईचे मंगलप्रभात लोढा यांसह मुंबईतील चार आमदार उपस्थित होते. ही बैठक प्रामुख्याने डांग, बलसाड व नवसारी या तीन जिल्ह्यांसाठी होती. हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मराठी भाषक मतदारांचे वर्चस्व आहे. त्यांची नाशिकच्या पेठ, सुरगाणा, सटाणा या तालुक्‍यांतील नागरीकांशी सोयरीक आहे. त्यामुळे या दहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी नाशिकच्या नेत्यांवर सोपविल्याचे सुत्रांनी सांगितले.

विधानसभा मतदारसंघ, त्यातील गाव व अंतिमतः मतदान केंद्र अशी त्रिस्तरीय संघटन यंत्रणा सक्रीय आहे. मतदानकेंद्राला शक्ती केंद्र असे नाव देण्यात आले आहे. या शक्तीकेंद्रात मतदारयादीतील एका पानावर असलेल्या मतदारांशी संपर्क, समन्वय, मतदारांना 'खुश' करण्याचे काम एक कार्यकर्ता करील. ही यंत्रणा एव्हढे प्रभावी वातावरण निर्मिती करील की त्यात विविध समाज, पटेल, ओबीसी दलीत यांनुसार मतदारांना संघटीत होण्यास प्रतिरोध करणार आहे. यातील कार्यकर्त्यावर महाराष्ट्रातुन नियुक्त केलेले कार्यकर्ते रोज लक्ष ठेवतील. त्यात जो कार्यकर्ता ढिसाळपणा करील, नाराज, संशयास्पद वाटेल त्याची माहिती तातडीने मुख्यमंत्र्यांच्या गांधीनगर येथील वॉररुमला कळविली जाईल. त्यानंतर लगेचच त्यांचे मनोमिलन केले जाईल.

ते शक्‍य झाले नाही तर नवा कार्यकर्ता त्याची जागा घेईल असे मायक्रो प्लॅनींग आहे. हाच पॅटर्न उत्तर प्रदेशातही राबविण्यात आला होता. ती अमित शहा यांची संकल्पना आहे. प्रचार साहित्य व अन्य साधनांची रेलचेल, रसद मदतीला असेल. या बळावर गुजरातची सत्ता राखू, असा आत्मविश्‍वास नवसारीच्या गोपनिय बैठकीत अमित शहा व अन्य नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यात कळीची भूमिका व मदत महाराष्ट्रातील कार्यकर्ते बजावतील. याची माहिती माध्यमे तसेच अन्य कोणालाही देऊ नये अशी ताकीदही देण्यात आल्याचे कळते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख