वधू-वर लग्नाच्या बेडीत, बाकी खऱ्याखुऱ्या बेडीत?

गुहागरमध्ये लग्नाच्या बेडीत तरुण-तरुणी अडकले. मात्र, त्याचबरोबर या विवाहाचे आयोजन करणारे वर-वधू यांचे पिता, पोलिसपाटील, भटजी या साऱ्यांना आणखी एका बेडीत अडकण्याची वेळ आली आहे
Guhagar Wedding Landed in Trouble due to Lock Down
Guhagar Wedding Landed in Trouble due to Lock Down

गुहागर : धार्मिक सोहळा, उत्सव, विवाह आदी कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश कधीच निघाले आहेत. जमावबंदी आदेशही आहेत. अशा परिस्थितीतही लग्नाच्या बेडीत तरुण-तरुणी अडकले. मात्र, त्याचबरोबर या विवाहाचे आयोजन करणारे वर-वधू यांचे पिता, पोलिसपाटील, भटजी या साऱ्यांना आणखी एका बेडीत अडकण्याची वेळ आली आहे. या साऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. तालुक्‍यातील भातगाव-कोसबीवाडी येथे हा प्रकार घडला.

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉक डाउन असताना गुहागर तालुक्‍यातील कोसबीवाडी येथे १०० ते १२० वऱ्हाडींना जमवून विवाह सोहळा करणाऱ्यांनाही बेडीत अडकण्याची वेळ आली. दोन्ही बाजूंचे यजमान, पोलिसपाटील व भटजीवर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर विवाह सोहळ्याची माहिती मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष साळसकर, पोलिस उपनिरीक्षक किरणकुमार कदम, माने, आठवले, शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. 

भातगाव-कोसबीवाडी येथील अनंत वेले यांच्या मुलाचा संगमेश्वर तुरळ येथील प्रकाश हारेकर यांच्या मुलीबरोबर ३ तारखेला सकाळी दहाला भातगाव-कोसबीवाडी येथे हा विवाह सोहळा झाला. या विवाह सोहळ्यात दोन्ही बाजूंचे वऱ्हाडी मिळून १०० ते १२० जणांची उपस्थिती होती. या वेळी भातगावचे पोलिस पाटील सिद्धोधन मोहिते यांचीही उपस्थिती होती.

१०० ते १२० जण जमून आदेशाचे उल्लंघन

देशभर मनाई आदेश असतानाही आयोजकांनी विवाह सोहळा आयोजित करून विवाह सोहळ्यास १०० ते १२० जण जमून आदेशाचे उल्लंघन केले. तसेच साथरोग पसरण्याचा संभव असताना जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पोचविण्याचा संभव असलेल्या हयगयीचे व घातकी कृत्य केल्याप्रकरणी वराचे वडील अनंत वेले, वधूचे वडील प्रकाश हारेकर, विवाह सोहळ्याला उपस्थित पोलिसपाटील सिद्धोधन मोहिते, विवाह लावून देणारे भटजी संजय जोशी यांच्यावर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com