सावंतांच्या मनमानीमुळे शिवसेनेत जुन्या नव्याचा संघर्ष

शिवसेनेच्या माध्यमातून आमदार, संपर्कप्रमुख आणि आता मंत्री झालेले तानाजी सावंत यांनी सोलापूरसह राज्याच्या राजकारणात जोरदार एन्ट्री केली.
Tanaji Sawant_
Tanaji Sawant_

सोलापूर : पडझडीच्या काळात शिवसेनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना खेड्यापाड्यापर्यंत वाढविली, जतन केली. मात्र, आता संपर्कप्रमुख तथा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी जुन्यांना डावलून मनमानी कारभार करायला सुरवात केल्याचा सूर शिवसेना पदाधिकाऱ्यांमधून निघत आहे.

पक्षवाढीसाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना शिवसेनेत जरुर घ्यावे मात्र, तेथील स्थानिक जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेण्याची गरज असल्याचीही अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. या पार्श्‍वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत जुन्या- नव्यांचा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेनेच्या युतीचा निर्णय अद्याप झाला नसताना विरोधकांना टक्‍कर देण्यासाठी शिवसेनेतील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गरज लागणार आहे.

त्यांचे संघटन मजबूत असणे गरजेचे आहे परंतु, रश्‍मी बागल, दिग्वीजय बागल, माजी आमदार दिलीप माने यांना शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी मंत्री सावंत यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांना, स्थानिक कार्यकर्त्यांना थांगपत्ताच लागू दिला नसल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

धनंजय डिकोळे, श्रावण भवर, पुरुषोत्तम बरडे, महेश कोठे, माजी आमदार रतिकांत पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही सावंतांच्या कारभाराबद्दल नाराज झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, जुन्यांना डावलून नव्यांना संधी देताना विश्‍वास न घेतल्यास त्याचा फटका सहन करावा लागेल, असा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नाराजी सावंत कशी दूर करणार, याची उत्सुकता लागली आहे. 

अन्‌ खंदारेंची भाजपशी जवळीक 
जनतेतून नाही परंतु, शिवसेनेच्या माध्यमातून आमदार, संपर्कप्रमुख आणि आता मंत्री झालेले तानाजी सावंत यांनी सोलापूरसह राज्याच्या राजकारणात जोरदार एन्ट्री केली. त्यांच्याकडे उत्कृष्ट वक्‍तृत्व असून पक्षसंघटन मजबूत करण्याचे कौशल्यही आहे. मात्र, त्यांच्या मनमानीला कंटाळून आता पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

त्यामध्ये माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांचाही समावेश आहे. पक्षाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत जुन्यांना संधीच मिळत नसल्याने खंदारे यांनी आता भाजपशी जवळीकता साधायला सुरवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थित भाजप इच्छूकांच्या मुलाखती पार पडल्या. त्यावेळी खंदारे यांनी आवर्जुन उपस्थिती लावली. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com