थोरातांच्या गावात मोदींच्या समर्थनार्थ ग्रामसभा, सरपंचाचा मात्र विरोध

जोर्वे गावाचा समावेश मतदारसंघ पुनर्रचनेत शिर्डी विधानसभेत झाल्याने या गावातील राजकीय वादाला थेट थोरात विखे वैमनस्याचे स्वरुप गेल्या काही दिवसांपासून लाभले आहे. याचा परिणाम सर्व राजकीय निर्णयावर होताना दिसतो
Balasaheb Thorat Village Gramsabha Supports Narendra Modi
Balasaheb Thorat Village Gramsabha Supports Narendra Modi

संगमनेर :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मातृभूमी असलेल्या जोर्वे गावात काल ग्रामसभा होऊन सरपंच निवडीबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युती सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले. या ठरावाला मात्र जोर्वेच्या सरपंचांनीच विरोध करीत हे राजकीय द्वेषातून होत असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

जोर्वे येथे ग्रामसभा घेण्यात आली. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखेंचे वर्चस्व असलेल्या या गावातील त्यांच्या समर्थकांची संख्याही बऱ्यापैकी आहे. या ग्रामसभेत मोदींच्या युती सरकारने मागील पंचवार्षिकच्या वेळी ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेवून, त्याची अंमलबजावणी केल्याने, लोकनियुक्त सरपंचपद अस्तित्वात आले होते. या निर्णयाला छेद देत राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने हा निर्णय रद्दबातल करुन पुन्हा निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंच निवडण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवला. या सरकारच्या निर्णयाचा प्रतिरोध करण्यासाठी भाजपा समर्थक सरसावले आहेत. 

जोर्वे येथे याचा प्रयत्य आला. ग्रामसभेत झालेल्या चर्चेत या बदललेल्या निर्णयामुळे पुन्हा राजकिय गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात राजकिय घोडेबाजार व राजकिय हस्तक्षेपामुळे दहशत वाढणार असल्याची भीती व्यक्त करुन, पंचायतराज व्‍यवस्‍थेत ग्रामपंचायत ही लोकशाहीचा पाया भक्‍कम करणारी व्‍यवस्‍था असल्याने थेट जनतेतून सरपंच निवड कायम ठेवण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवण्यात आल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने लागु केलेल्‍या भारतीय नागरीकत्‍व सुधारणा कायद्याचे ग्रामसभेत स्‍वागत करुन या कायद्याला पाठींबा देण्‍यात आला.

सरपंचाचा ठरावालाच विरोध

या ग्रामसभेची कुणकुण लागताच शिर्डी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक सुरेश थोरात व विद्यमान सरपंच रवींद्र खैरे यांनी लागलीच जोर्व्यातील विद्यमान सरपंचांचा या ग्रामसभेच्या निर्णयाला विरोध असल्याचे प्रसिध्दी पत्रक काढल्याने या विषयाची जोरदार चर्चा सुरु झाली. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली मातृभूमीत होणाऱ्या विकासकामांना अडकाठी घालणाऱ्यांना गावात किंमत नसलेल्या मुठभर लोकांनी ही ग्रामसभा घडवल्याचे सांगत थेट सरपंच निवडीचा जोर्वे ग्रामसभेचा तथाकथीत ठराव राजकीय खोडसाळपणा असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. त्याला फारसे महत्व देण्याची गरज नाही, हा राजकीय द्वेष व प्रसिध्दीसाठी केलेला स्टंटबाजीचा प्रकार असल्याची टीका केली आहे. 

जोर्वे ग्रामपंचायतीचे सरपंचपद काँग्रेस पक्षाच्या रवींद्र खैरे यांच्याकडे आहे. तसेच अनेक सदस्य व ग्रामस्थही बाळासाहेब थोरात व काँग्रेसच्या विचाराचे असून, नेहमीच त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. मंत्री थोरात यांचे राज्यात वाढणारे महत्व पहावत नसल्याने, काही राजकीय शक्तीच्या माध्यमातून जोर्वे गावात वाद निर्माण कऱण्याचा प्रयत्न सुरु आहे. विकास कामात सातत्याने अडथळे आणणाऱ्या  मुठभरांना ग्रामस्थ महत्व देत नाहीत. म्हणून स्वतःचे महत्व व प्रसिध्दी वाढविण्यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

हा राजकीय खोडसळपणा

प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला अधिक महत्व देत लोकशाही अधिकाधिक मजबूत करण्यासाठी, महाविकास आघाडीने घेतलेला हा दूरदृष्टीचा निर्णय आहे. या निर्णयाचे संपूर्ण राज्यातून स्वागत होत असताना, जोर्वेतील तथाकथित पुढार्‍यांनी प्रसिध्दीसाठी केलेला राजकिय खोडसाळपणा आहे. या पत्रकावर सरपंच रवींद्र खैरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद थोरात, दीपक वारे आदींसह विविध पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

विखे, थोरातांच्या वादाचा परिणाम

जोर्वे गावाचा समावेश मतदारसंघ पुनर्रचनेत शिर्डी विधानसभेत झाल्याने या गावातील राजकीय वादाला थेट थोरात विखे वैमनस्याचे स्वरुप गेल्या काही दिवसांपासून लाभले आहे. याचा परिणाम सर्व राजकीय निर्णयावर होताना दिसतो. काही काळापूर्वी विखे व थोरात एकाच काँग्रेस पक्षात असूनही त्यांच्यातील कुरघोड्या थांबल्या नव्हत्या. आता तर ते एकमेकांचे थेट विरोधकच झाल्याने या संघर्षाची धार तीव्र झाल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com