दारू पिऊन वाहन चालविल्यास लायसन्स निलंबित : रावते

दारू पिऊन वाहन चालविल्यास लायसन्स निलंबित : रावते

मुंबई : दारु पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना (लायसन्स) ६ महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर उतरविल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री व रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

वाढते अपघात रोखण्याच्या दृष्टीने आजच्या बैठकीत व्यापक चर्चा होऊन विविध निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. अनुप यादव, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कोरगावकर, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेशकुमार यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अनेक अपघात हे वाहनचालकांनी दारुच्या नशेत वाहने चालविल्याने होत असल्याचे विविध अहवालातून निष्पन्न झाले आहे. हे रोखण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांमार्फत सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मागील २ महिन्यात राज्यात १२ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कारवाया ह्या दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी आहेत. आता अशा दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी त्यांचा परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.


विमा न उतरविलेले किंवा विम्याची मुदत संपेलेले वाहन रस्त्यावर उतरविल्यास आणि दुर्देवाने अशा वाहनाचा अपघात झाल्यास जखमी किंवा मृतास कोणत्याही प्रकारचे विमा लाभ मिळत नाहीत. सध्या अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण आता यापुढे अशा वाहनांवर जागेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित वाहन ताब्यात घेतले जाईल. वाहनधारकाने विमा घेऊन आल्यानंतर आणि अधिकृत दंड भरल्यानंतरच वाहन परत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक खासगी प्रवासी वाहने (ट्रॅव्हल्स) हे पार्सल वाहतूक, कुरिअर वाहतूक किंवा माल वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ट्रॅव्हल्स वाहनांना फक्त प्रवासी वाहतुकीसाठी परवाने देण्यात आले आहेत. पण अनेक ट्रॅव्हल्स बेकायदेशीररित्या माल वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांवरही कारवाई करण्यात यावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. लोकांनीही अशा वाहनांमधून प्रवास करु नये, असे आवाहन मंत्री श्री. रावते यांनी यावेळी केले. न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिरिक्त भार वाहणाऱ्या (ओव्हरलोड) मालवाहतूक वाहनांवर फक्त दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com