सरकारने गडकिल्यांवर 'छमछम'ची व्यवस्था केली : पवार 

महाराजांनी परकियांपासून राज्याचा बचाव होण्यासाठी किल्ले बांधले. हे किल्ले नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. पण सरकारने गडकिल्यांवर छमछम आणण्याची व्यवस्था केली.
sharad-pawar-in-Marathwada
sharad-pawar-in-Marathwada

नांदेड : शिवछत्रपतींच्या नावे सत्तेत आलेले हे सरकार महाराजांच्या नावाचा केवळ नावाचा वापर करत आहे. महाराजांनी परकियांपासून राज्याचा बचाव होण्यासाठी किल्ले बांधले. हे किल्ले नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. पण सरकारने गडकिल्यांवर छमछम आणण्याची व्यवस्था केली. 


महाराष्ट्राचा इतिहास बाजुला ठेवून एक चंगळवादाची संस्कृती राज्यात प्रस्थापित करण्याचे काम हे सरकार करत आहेत. अशांना आपली जनता थारा  देणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड येथे बोलताना केली

 श्री. पवार यावेळी बोलताना म्हणाले, "आजच्या राज्यकर्त्यांना टीका-टिप्पणी करण्याशिवाय काहीच येत नाही. आज पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये असल्याने  विरोधी पक्षातील लोकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत की घराबाहेर पडल्यास अटक करू. शासनाने आदेश काढले की, मोदी नाशिक मधून जाईपर्यंत कांदा बाजारात आणायचा नाही. यांना कांद्याचीही भीती वाटते. पण या पद्धतीने लोकशाही घालवण्याचे काम होत आहे." 


" नव्या पिढीचे नेतृत्व उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यात जाण्याचे काम मी करत आहे. चार वेळा तुम्ही मला राज्याचा मुख्यमंत्री केलं. मला अजून काहीच नको. नवीन पिढीला राज्याचा रथ ओढण्याची संधी आता द्यायची आहे. हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होईल यात शंका नाही," असेही श्री. पवार म्हणाले.     


येथे झालेल्या सभेत उपस्थितांना संबोधित केले. राज्यात आणि देशात सुमारे ६५-६६ % लोक शेती करतात. आज हाच लाखोंचा पोशिंदा आणि दोन वेळेच्या भुकेचा प्रश्न सोडवणारा अन्नदाता संकटात आहे. आपल्याकडे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

आजच्या सरकारला शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही, असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, " ते सांगतात, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही तर कंपन्यांचे कर्ज माफ करू कारण कंपन्या हातांना काम देतात. पण जो भूक भागवतो त्यांना कर्जमाफी नाही. अशा लोकांच्या हातात आज देशाची सूत्रं आहेत."

असे सांगून श्री पवार पुढे म्हणाले, " मी कृषीमंत्री असताना कांद्याचा भाव वाढला असता भाजपा नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आवाज उठवला. पण शेतकऱ्यांना त्यातून दोन पैसे मिळाले असते तर काय बिघडलं असतं? काही अडचण आली तर परदेशातून माल आयात करण्याची भूमिका हे सरकार घेतं पण आपल्या शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू देण्याची यांची भूमिका नाही."

"आज देशात लाखो तरुण बेकार आहेत. नाशिकमध्ये अनेक कारखाने असतानाही आर्थिक मंदीमुळे ५४ कारखाने बंद पडले आणि १६ हजार तरूण बेरोजगार झाले. आधीच बेकारी.. त्यात ज्यांच्या हाती काम आहे त्यांना बोरोजगारीला सामोरं जावं लागतंय. यामुळे आज तरूणांची लग्न जमणे कठीण झालेय, याबाबत सरकार काय करतंय?, असा सवाल त्यांनी राज्यकर्त्यांना केला . 

मुंबईत १२० कापड गिरण्या होत्या त्यातील केवळ १० गिरण्या आता सुरू आहेत. मुंबईतील गिरणगाव गेलं, त्याठिकाणी आज मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. पण त्याठिकाणी गिरणी कामगारांना जाण्याची परवानगी नाही. सबंध गिरणगांव उद्ध्वस्त झालं.

देशात मोठी आर्थिक मंदी आल्याचे चित्र आहे. ही मंदी कायम राहिली तर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. गुंतवणुकीची समीकरणं बिघडली आहेत. पंतप्रधान मोदी सांगतात की, इतके नवे कारखाने देशात आले पण किती आले यापेक्षा कारखाने बंद झाले याची आकडेवारी मोदींनी जाहीर करावी ,अशी मागणी त्यांनी यावेळी केली . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com