Government officers burdened to work on sunday | Sarkarnama

दमछाक होऊन पाणी पाणी म्हणण्याची आली जिल्हा प्रशासनावर वेळ 

अभय कुळकजाईकर :सरकारनामा वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

सुटीच्या दिवशीच रविवारी (ता. नऊ) घेण्यात आलेल्या या दोन बैठकांचे नियोजन करण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली असून अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करून ‘पाणी - पाणी’ म्हणण्याची वेळ आली. 

 नांदेड ः राज्याचे कृषि आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी नांदेडच्या दौऱ्यावर आल्यावर उन्नत शेती समृद्ध शेतीकरी अभियान कार्यक्रमात असताना एका शेतकऱ्याच्या शेतात पंगतीत जेवण घेतले. 
 

 

नांदेड:उन्हाळ्याची चाहूल लागली असून पाणीटंचाईच्या झळा आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी बसू लागल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या संदर्भात बैठकाही घेण्यात येत आहेत. नांदेडला मात्र एकाच दिवशी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि राज्याचे कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. सुटीच्या दिवशीच रविवारी (ता. नऊ) घेण्यात आलेल्या या दोन बैठकांचे नियोजन करण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली असून अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करून ‘पाणी - पाणी’ म्हणण्याची वेळ आली. 

गेल्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे यंदा पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यात कमी प्रमाणात जाणवत होत्या. मात्र जसा एप्रिल महिना सुरू झाला तसा पाणीटंचाईस सुरूवात झाली असून काही ठिकाणी आता टॅंकरही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ही बाब समाधानकारक असली तरी त्याला राजकीय स्वरुप प्राप्त झाल्याचे रविवारी दिसून आले. 

राज्याचे कृषि आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई निवारण आराखड्याची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र खासदार अशोक चव्हाण यांनी पाणीटंचाईच्या आढाव्याची स्वतंत्र बैठक घेतली आणि त्यामध्ये अर्धापूर, मुदखेड व भोकर या तीन तालुक्याचा आढावा त्यांनी घेतला. त्यामध्ये आमदार अमिता चव्हाण यांचीही उपस्थिती होती. दुसरीकडे राज्यमंत्री खोत यांनी पाणीटंचाई आढाव्याची बैठक घेतली. या बैठकीला कॉंग्रेसचे आमदार डी. पी. सावंत, वसंत चव्हाण तसेच महापौर शैलजा स्वामी उपस्थित होत्या. 

पाणीटंचाईवर दोन बैठकांचे नियोजन करण्यात मात्र जिल्हा प्रशासनाची पुरती दमछाक झाली. एेन उन्हाळ्यात आणि ते देखील रविवारी सुटीच्या दिवशी जिल्हा प्रशासनावर पाणी पाणी होण्याची वेळ आली.

पाणीटंचाईवरच्या विषयावर लोकप्रतिनिधी सजग असल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी अशोक चव्हाण आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र बैठका घेतल्यामुळे त्याची राजकीय चर्चा मात्र जिल्ह्यातील राजकारणात जोरात सुरू झाली आहे. 
 
सदाभाऊ जेवले पंगतीत 

विशेष म्हणजे सदाभाऊ खोत यांच्यासोबत जिल्ह्यातील सत्ताधारी असलेली शिवसेना आणि भाजपाची मंडळी सोबत नव्हती फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत होते, हे आणखी विशेष. एवढ्या उन्हामध्येही सदाभाऊंनी मात्र जिल्ह्यात दोन तीन ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांनी चर्चाही केली आणि त्यांच्यासोबत जमिनीवर बसून एकत्र बसून अंगत - पंगतीत भोजनही घेतले. त्यामुळे ‘सदाभाऊ जेवले पंगतीत’ अशी चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे आदी कॉंग्रेसची नेते मंडळी निवडणुकीच्या काळात सोन्याच्या ताटात जेवल्याची व त्यानंतर केळीच्या पानावर जेवल्याची जोरदार चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषि आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जमिनीवर बसून पंगतीत जेवण केल्याच्या घटनेला महत्व प्राप्त झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख