governer and marathi bhasha | Sarkarnama

महाराष्ट्रात राहाता तर मराठी शिका : राज्यपाल कोश्‍यारी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश प्रगती करत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून अनेक रस्ते बनले आहेत. नितीन गडकरी यांनी ही योजना यशस्वीपणे राबविली म्हणूनच लोक त्यांना गडकरी ऐवजी सडककरी म्हणू लागल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. उत्तराखंड भवन राज्यासाठी सन्मानाचे प्रतीक आहे.

वाशी : महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी आणि उत्तराखंडातली पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. त्यामुळे उत्तराखंडातल्या नागरिकांना मराठी बोलणं फारसं अवघड नाही. महाराष्ट्रात राहता तर मराठी शिका, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. वाशी सेक्‍टर 30 ए मधील भूखंड क्रमांक 3 येथे उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनचे उद्‌घाटन राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक, बेलापूर मतदारसंघाचे आमदार मंदा म्हात्रे, महापौर जयवंत सुतार आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश प्रगती करत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून अनेक रस्ते बनले आहेत. नितीन गडकरी यांनी ही योजना यशस्वीपणे राबविली म्हणूनच लोक त्यांना गडकरी ऐवजी सडककरी म्हणू लागल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. उत्तराखंड भवन राज्यासाठी सन्मानाचे प्रतीक आहे. पर्यटन, उत्पादन, गुंतवणूकदारांसाठी या भवनात कार्यालय बनवणार असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांनी दिली. पर्यटन आणि चित्रपट शूटिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उत्तराखंडमध्ये ऍडव्हेंचर टूरिझम डेव्हलप करणार आहे. 1200 कोटी रुपये खर्च करून टेहरीची पर्यटन म्हणून विकसित करणार असल्याची माहिती रावत यांनी दिली. तसेच काश्‍मीरमध्ये सर्वात मोठे उद्यान असून त्यापेक्षा मोठे उद्यान उत्तराखंडमध्ये चांगल्या पद्धतीचे साकरण्यात येणार आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील, असे रावत म्हणाले. 
कॅन्सर रुग्णांसाठी दोन खोल्या राखीव 
उत्तराखंडमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असून तेथील शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 30 रुपये भाव देण्यात येतो. तेवढा भाव संपूर्ण देशात कुठेही देण्यात येत नसल्याचा विश्‍वास रावत यांनी व्यक्त केला. मुंबईमधील टाटा रुग्णालयामध्ये कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी उत्तराखंडमधील नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी उत्तराखंड भवनमध्ये दोन रूम राखीव ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री रावत यांनी स्पष्ट केले. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमानंतर उत्तराखंडाची संस्कृती दाखवणाऱ्या नृत्याचा कार्यक्रम झाला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख