कठीण समय येता कोण कामास येतो?, अर्थात सरकारी कर्मचारीच! - Governement officials Working Tireleslly in Fight Against Corona | Politics Marathi News - Sarkarnama

कठीण समय येता कोण कामास येतो?, अर्थात सरकारी कर्मचारीच!

संपत देवगिरे 
बुधवार, 1 एप्रिल 2020

कोरोना विषाणू विरोधात सुरु असलेल्या लढ्यात राज्य शासनापासून, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी अन्‌ अगदी सामान्य नागरीकही सहभागी झाले आहेत. अद्याप तरी महाराष्ट्राने केलेले काम देशभरात उजवे अन्‌ कौतुकास्पद मानले जाते. मात्र या अडचणीत, संकटात कोण कामास येते?. या प्रश्‍नाचे उत्तर निश्‍चितच आरोग्य विभाग, शासकीय कर्मचारी अन्‌ नेहेमीप्रमाणे पोलिस असेच आहे

नाशिक : 'कोरोना' विषाणू विरोधात सुरु असलेल्या लढ्यात राज्य शासनापासून, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी अन्‌ अगदी सामान्य नागरीकही सहभागी झाले आहेत. अद्याप तरी महाराष्ट्राने केलेले काम देशभरात उजवे अन्‌ कौतुकास्पद मानले जाते. मात्र या अडचणीत, संकटात कोण कामास येते?. या प्रश्‍नाचे उत्तर निश्‍चितच आरोग्य विभाग, शासकीय कर्मचारी अन्‌ नेहेमीप्रमाणे पोलिस असेच आहे. हे 'थॅंकलेस' काम करतांना बाहेरची मंडळी तर दूरच कुटुंबातही त्यांच्याबाबत चिंतेचेच वातावरण असते.

नाशिकमध्ये 'कोराना'साठी सध्या सिव्हील, महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन आणि तपोवनातील तत्पुरते रुग्णालय उभे केले आहे. येथील रुग्णांवर उपचार करतांना येथील डॉक्‍टर्स, परिचारीका, स्टाफ सतत तणावात असतात. कारण आहे इतरांना बरे करता करता 'कोरोना'चा कोवीड 19 विषाणू त्यांच्यासोबत त्यांच्या घरात प्रवेश करतो की काय याची चिंता. दोन दिवसांपूर्वी एक पॉझीटिव्ह रुग्ण डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात येणार असा निरोप आला. तेव्हा या परिचारीका, स्टाफने खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाचा डिस्चार्ज होईपर्यंत घरी न जाता रुग्णालयातच मुक्कामाचा निर्णय घेतला होता. साहित्य, योग्य व नेमकी औषधे, सुरक्षात्मक साधने यांचा तुटवडा, उपचाराची नेमकी कार्यवाही, औषधे नसतांना काम करायचे असल्याने तणावाची तलावर सतत त्यांच्या डोक्‍यावर असते.

अनिष्ट प्रवृत्ती सर्वत्र आढळतात. त्याला शासकीय अधिकारी, कर्मचारी हे अपवाद असे असतील? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज हेच लोक (देवदूत बनून) मदतीला धावून आले आहेत. वारंवार या मंडळींनी आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. मग ती वेळ निवडणुकांची असो, जनगणनेची असो, दंगल, पोलिओ निर्मुलनाची, महापूर वा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची. जीव धोक्‍यात घालून सर्वप्रथम धावून येतात ते मंत्री वा शासकीय अधिकारी, कर्मचारी. आजही आपण हे अनुभवत आहोत. युद्धात सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणे वैद्यकीय सेवेतील डॉक्‍टर्स, परिचारिका, कर्मचारी, पोलीस बांधव, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी, अधिकारी कर्तव्य भावनेतून अहोरात्र कोरोनाशी लढताहेत.

प्राणाची पर्वा न करता संकट समयी धावून येणाऱ्या या आपल्या बांधवांप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची ही एक संधी आहे. राजकीय पुढारी असोत वा अधिकारी-कर्मचारी... शेवटी ही मंडळी आपल्यातीलच आहेत... ही काही परग्रहावरून आलेली नाहीत... आणि कुठल्याही प्रकारचे ट्रेनिंग नसतांना सर्वप्रकारच्या आपत्तीत ज्यांची मदत आपण गृहीत धरू शकतो अशी ही कम्युनिटी आहे. संपूर्ण सेवकाळात अशी आपत्ती आणि तिला सामोरं जायची संधी शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना क्वचितच मिळते.

या संकटसमयी हजारो शासकीय कर्मचारी/अधिकारी प्राणाची पर्वा न करता प्रत्यक्ष मैदानात लढत आहेत. उद्या हे "न भूतो न भविष्यती" संकट ओसरल्यावर राजकीय पदाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्यातील समर्पण भावनेने कार्य करणारे नवीन नेतृत्व आपल्याला मिळेल, काहींना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येईल. श्री विकास खारगे, श्री शशिकांत मंगरुळे यांच्यासारखी काही मंडळी आजच या कसोटीच्या आपली कौटुंबिक दुःख बाजूला ठेवून आपली जबाबदारी आणि क्षमता सिद्ध करीत आहेत.

उद्याच्या सक्षम भारताची संधी या समस्येत दडलेली आहे. आपण प्रत्यक्ष सीमेवर लढायला जाऊ शकत नाहीत, कोरोनाशी लढाईत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाहीत... मात्र आपण या वीरांचे कौतुक नक्कीच करू शकतो, नैतिक बळ त्यांच्या पाठीशी उभे करू शकतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख