Gossip from PCMC | Sarkarnama

चर्चा उद्योगनगरीतल्या......

उत्तम कुटे
शनिवार, 8 एप्रिल 2017

एकाच कामाची दोन उद्‌घाटने

एकाच कामाची दोन उद्‌घाटने
बैलगाडा शर्यतीवरून भाजपचे भोसरीतील आमदार महेश लांडगे आणि शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांच्यातील कलगीतुऱ्यानंतर लगेचच पिंपरी-चिंचवडमध्ये आजी माजी सत्ताधाऱ्यांत असेच श्रेयाचे राजकारण आता रंगले आहे. गतवर्षाच्या शेवटास (21 डिसेंबर) पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना या पक्षाच्या सभागृहनेत्या मंगला कदम यांच्या प्रभागातील (संभाजीनगर,चिंचवड) जलतरण तलावाचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. आता आज पुन्हा त्याचेच उद्‌घाटन भाजप पालिकेत सत्तेत आल्यानंतर दुसऱ्यांदा होत आहे.
त्यामुळे आमच्या कामाचे श्रेय सत्तेत नुकतेच आलेले व अजून अशा कामाची सुरवात न केलेले भाजप घेत असल्याबद्दल कदम यांनी आज पत्रकारपरिषद घेत त्याला कडाडून विरोध केला. न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा लाजिरवाणा प्रकार म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याचे त्या म्हणाल्या. तर, पालिका निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत हे उद्‌घाटन केलेले असल्याने उद्या त्याचा लोकार्पण सोहळा ठेवला असल्याची मखलाशी भाजपचे पालिकेतील सभागृहनेते एकनाथ पवार यांनी यावर केली आहे.

"पारदर्शक' कारभार पत्रकार कक्षाच्या मुळावर
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 31 वर्षे जुना व अत्यंत सोईचा असा महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावरील पत्रकारकक्ष हटविण्यात यावा, असे पत्र स्थायी समितीने पालिका आयुक्तांना दिले आहे.त्यानंतर महापौर, उपमहापौर,विरोधी पक्षनेते, स्थायी समितीसह विविध विषय समित्यांची कार्यालये असलेल्या या मजल्यावरील हा कक्ष हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायीसह विविध पदाधिकाऱ्यांना कोण भेटायला येते यावर या कक्षातून कळते. त्यामुळे आपल्या कारभाराच्या आड येणारा हा कक्षच हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पारदर्शक कारभारासाठी जागल्याची (वॉच डॉग) भूमिका बजावणारा हा कक्ष विनाकारण हटविण्यात येत असल्याने हा निर्णय बदलण्याची लेखी मागणी पत्रकारांनी आता आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख