गर्दीतील माझ्या वडिलांना जाॅर्ज यांनी पाहिले आणि पोलिसांना सांगून बोलावून घेतले...`

माजी संरक्षणमंत्री जाॅर्ज फर्नांडिस हे नेते म्हणून कसे होते, याची आठवण सांगणारा हा लेख
गर्दीतील माझ्या वडिलांना जाॅर्ज यांनी पाहिले आणि पोलिसांना सांगून बोलावून घेतले...`

आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांनी साधू, सरदारजी, ख्रिस्ती फादर अशा वेशभूषा करून पोलिसांना चकवा दिला. त्यांनी मदर तेरेसा यांच्या आश्रमात, त्यांच्यासमक्ष शरणागती स्वीकारली. 


मी नऊ वर्षांचा असताना 1957 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी पहिल्यांदा व्यक्तिगत संबंध आला. माझे वडील त्यांच्या समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्या निवडणुकांची जबाबदारी सांभाळत होते. फर्नांडिस तेव्हा डोंगरी भागातून महापालिका निवडणूक लढवत होते. त्यानंतर त्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही मुंबईत युवक क्रांती दल स्थापन केले; स्थापनेच्या बैठकांना ते स्वतः आले होते. त्यांच्यासोबत गोपाळ दुखंडे, न्या. हेमंत गोखले, हुसेन दलवाई आदी मान्यवर आले होते. त्यानंतरही युक्रांदला त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळत होते. मी 1972 मध्ये शिक्षक सभेचे काम करू लागलो. रमेश जोशी यांच्या शिक्षक सभेचा मी उपाध्यक्ष होतो. तेथेही फर्नांडिस यांच्या भेटी होत असत. त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत पाहायला मिळाली. त्यांची स्मरणशक्ती अत्यंत उत्तम होती. 

बडोदा डायनामाईट प्रकरणात 1976 मध्ये मला मुंबईतील तुरुंगातून दिल्लीतील तिहार तुरुंगात हलवण्यात आले. त्या वेळी फक्त नाव ऐकून त्यांनी मला ओळखले, त्यांनी माझ्या वडिलांचे अचूक वर्णन केले. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी माझ्या वडिलांना 1964-65 नंतर पाहिले नव्हते. माझी आई गुजराती पद्धतीने साडी नेसायची; मात्र तिला गुजराती एक शब्दही येत नसे. माझ्या इमारतीमधील जिना कसा काळोखा होता आणि त्यामुळे पाय कसे घसरायचे, या 1957 मधील आठवणी त्यांनी 1976 मध्ये सांगितल्या. माझ्या वडिलांची व त्यांची भेट अनेक वर्षे झाली नव्हती, तरीही कोकण रेल्वेच्या उद्‌घाटनावेळी गर्दीत उभ्या असलेल्या माझ्या वडिलांना त्यांनी पाहिले आणि पोलिसांना सांगून जवळ बोलावून दहा मिनिटे गप्पा मारल्या. 

फर्नांडिस यांनी आणीबाणीच्या काळात वेगवेगळे वेश परिधान करून बराच काळ पोलिसांना चकवा दिला. कधी ते साधू, तर कधी सरदारजीच्या वेशात फिरत असत. कधी दाक्षिणात्याप्रमाणे लुंगी लावून, तर कधी मुस्लिमांची गोल टोपी घालून आणि कधी ख्रिस्ती फादरच्या पायघोळ झग्यात फिरत असत. नंतर आपल्याला गोळ्या घालण्याचा आदेश निघाल्याचे (ही माहिती त्यांनीच आम्हाला तुरुंगात दिली होती) कळल्याने त्यांनी शरणागती पत्करण्याचे ठरवले. ती शरणागतीही कोलकाता येथील मदर तेरेसा यांच्या आश्रमात आणि त्यांच्या उपस्थितीत झाली. त्यामुळेच की काय; पण नंतर फर्नांडिस यांच्यावर पुढील कारवाई झाली नाही. त्यांनी शरणागती पत्करतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर बातमी होईल व त्यामुळे इंदिरा गांधी यांची प्रतिमा खराब होईल, याची काळजी घेतली. नंतर त्यांच्यावर खटला भरण्यात आला. मुंबईत आम्ही फक्त तीन ठिकाणी स्फोट करू शकलो, किंग्ज सर्कल पूल, मुंबई सेंट्रल व ब्लिट्‌झचे कार्यालय ही ती ठिकाणे.

"पाटील पडलाच पाहिजे'

जॉर्ज फर्नांडिस यांना सुरुवातीला मुस्लिम भागातून पाठिंबा मिळाला होता; पण नंतर 1971 मध्ये युसुफ पटेल, दाऊद इब्राहीम ही मंडळी त्यांच्याविरोधात गेली होती. त्यांनी 1967 मधील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे बलाढ्य नेते स. का. पाटील यांना पराभूत केले; त्याचे आम्हीही साक्षीदार होतो. स. का. पाटील यांनी "पीपीपी' म्हणजे "पाटील-प्रोग्रेस-प्रॉस्पेरिटी' अशी घोषणा दिली होती. त्यावर फर्नांडिस यांनी "पीपीपी' म्हणजे "पाटील पडलाच पाहिजे' अशी प्रतिघोषणा देऊन धमाल उडवून दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com