gore anadandrao patil khunnas | Sarkarnama

कॉंग्रेस कमिटीत गोरे-आनंदरावांची खुन्नस ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 जुलै 2017

स्वातंत्र्य सैनिक व जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भि. दा. भिलारे गुरुजी यांचे आज पहाटे निधन झाले. कॉंग्रेस भवनात बैठक सुरू होण्यापूर्वी भिलारे गुरूजींना आदरांजली वाहिली जाईल, असे ज्येष्ठ कार्यकर्त्यांना वाटले होते. परंतू तसे झाले नाही. 
 

सातारा: कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेले आमदार आनंदराव पाटील व आमदार जयकुमार गोरे आज कॉंग्रेस भवनात झालेल्या बैठकीत निवडणुक निरिक्षकांसमोरच पुन्हा भिडले. एकमेकांच्या शेजारी बसून दोघांनीही एकमेकांवर तोंडसुख घेतले. 

कॉंग्रेसचे निवडणुक निरिक्षक शकिल अहमद व शहर प्रभारी तौफिक मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कर्जमाफी आणि जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, महिला प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, धैर्यशिल कदम, भिमराव पाटील, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम, राहूल घाडगे, दयानंद भोसले, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, किशोर बाचल यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जयकुमार गोरे यांनी सुरवातीला भाषणास सुरवात केली. त्यांनी आनंदराव पाटील यांच्यावर हिंदीतूनच टिका केली. ते म्हणाले, पक्षात अनेकजण आले आणि गेले पण मी कोण आहे हे सांगण्यासाठी येथे आलो आहे. मी कॉंग्रेसचा सदस्य आहे. नानांच्या दोन टर्ममध्ये सातारा कॉंग्रेसमध्ये ताकद आली पण जिल्हा कॉंग्रेसमध्ये कोण कॉंग्रेसचा हे सांगण्याची वेळ आली आहे. पक्षात शिल्लक राहिलेल्यांना बरोबर घेऊन पुढे गेले पाहिजे. मागच्या बैठकीत जे बोलले ते त्यांचे विचार होते. कोण बरोबर, कोण चुकीचे, कोण काम करतो कोण नाही, कोण अध्यक्ष होणार हा गौण विषय आहे. कॉंग्रेस पक्ष वाढला पाहिजे. पण काहीजण जिल्हाध्यक्ष कोण होणार, हे सांगत आहेत. त्यांना हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्‍न उपस्थित करून गोरे म्हणाले, पक्ष कुठे आहे, याचा शोध घ्या. कुणाला गावात किती मते मिळतात हे बघितलयं. मी पक्षातच आहे, मागे बसलेल्यांना हे माहित नाही. पण ज्याला कोणाला कायमचा अध्यक्ष व्हायचे आहे, त्यांनी व्हावे. त्याला माझा विरोध नाही. पण त्यांनी आपली उंची किती, हे तपासून पहावे. आपल्याला पृथ्वीराज बाबांच्या उंचीचा सन्मान ठेऊन काम करायचे आहे. त्यामुळे कॉंग्रेसची घटना कोणी मला शिकवू नये. आपली लढाई विरोधी पक्षासोबत आहे, पण आपण आपल्यातच भांडत आहोत. कोणाच्या बाजूने कोण हेच समजत नाही. आपण फार विद्वान आहात, पण आम्हाला पक्ष, संघटना काय हे शिकवू नका, असा सल्ला नानांना देत गोरे म्हणाले, पक्ष मजबूत होता पण कोणामुळे ? कोणी पक्ष सोडला याचा विचार करा. 

आनंदराव पाटील म्हणाले, मी जिल्हाध्यक्ष व्हायचे ताम्रपत्र घेऊन आलेलो नाही. पण तरीही मी पक्षात खूप चांगले काम केले हे आमच्या आमदारांच्या तोंडून आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पक्ष वाढविणे हे एकट्या नानाचे काम नाही. ज्याला कोणाला अध्यक्ष व्हायचे ते होऊ देत पण कोणाची लाज काढू नका, असा सल्ला त्यांनी गोरेंना दिला. 

शकिल अहमद यांनी आपल्या भाषणात गोरे व नानांचे कान धरले ते म्हणाले, पक्ष संघटनेत वाद चालणार नाहीत. पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. घरातील वाद घरातच ठेवा पक्ष संघटनेची हानी होईल, असे वागू नका. तसेच फसव्या कर्जमाफीच्या विरोधात पक्षाने जिल्हा, तालुका, गाव व ब्लॉक पातळीवर फलक लावून भाजपचा चेहरा उघडा पाडायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी धैर्यशिल कदम, सहदेव अगवणे यांची भाषणे झाली. यावेळी मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख