टीकेची झोड उठताच भाजपकडून गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाचा आढावा

टीकेची झोड उठताच भाजपकडून गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाचा आढावा

औरंगाबाद : राज्यात कमळ फुलविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा प्रश्‍न या सरकारला चार वर्षात सोडविता आला नाही. याबद्दल भाजपवर टीकेची झोड उठताच जाग आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात शुक्रवारी (ता.14) तातडीची बैठक घेत स्मारकाचे काम वेगाने होईल असे जाहीर केले. तत्कालिन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 2015 मध्ये स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी शासकीय दुध डेअरीच्या 3 एकर 27 जागेची निवडही करण्यात आली. सरकार दरबारी या स्मारकाचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. याबाबत मुडेंच्या स्मृतीदिनीच "सरकारनामा'ने यावर प्रकाश टाकला होता. 

याची दखल घेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीनंतर डॉ. कराड म्हणाले, संबधित जागा नगरविकास विभागाकडे देण्यात आलेली आहे. सिडको आणि शहर विकास यांच्यासोबत सामंजस्य करार होईल. याबाबतचा मसुदा सिडको व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठविला आहे. आता येत्या बुधवारी (ता.19) मी आणि आमदार अतुल सावे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निधी उपलब्ध होईल. यासाठी 50 कोटी 61 लाख एवढा खर्च येणार असून लवकरच या कामाला सुरवात होईल, असा दावाही डॉ. कराड यांनी केला. 

मे 2015 मध्ये खडसे यांनी त्यांच्या दालनात नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, बालविकास मंत्री पंकजा मुंडे, तत्कालीन विभागीय आयुक्‍त उमाकांत दांगट व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यानंतर 2016 मध्ये या स्मारकासाठी दिल्लीच्या क्रिएटीव्ह ग्रुपने प्रस्ताव तयार करून दिला. मात्र, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार व्हावे लागले आणि गोपीनाथ मुंडे यांचे स्मारकही रखडले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com