GOPINATH MUNDE AND DANAVE | Sarkarnama

मी राजकारणात आलो तेच गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच !

रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष
बुधवार, 12 डिसेंबर 2018

भोकरदन : मला आजही आठवते मी भोकरदन पंचायत समितीचा सभापती असतांना गोपीनाथ मुंडेंनी मला सक्रीय राजकारणात येण्यास सांगितले. पण तशी परवानगी मला कुटुंबाकडून मिळणार नव्हती. ही अडचण सांगितली तेव्हा मुंडे साहेबांनी मला घेऊन थेट घर गाठले. माझ्या वडिलांना भेटले आणि म्हणाले "माझ्यावर विश्‍वास टाका, रावसाहेबांना माझ्या सोबत द्या' वडिलांनीही त्यांच्यावर विश्‍वास टाकला आणि आज मी 35 वर्षांपासून यशस्वी राजकारण करतोय. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी राजकारणात आल्याची आठवण रावासाहेब दानवे यांनी त्यांच्या जयंतीदिनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली. 

मुंडेचा सहवास आणि त्यांच्या आठवणी सांगतांना रावसाहेब दानवे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपची आज जी ताकद आहे ती दिवंगत गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला गोपीनाथ मुंडे यांनी नुसते राजकारणात आणले नाही तर यशस्वी देखील केले. माझ्या सारख्या असंख्य तळागळातील कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले मुंडे-महाजन या जोडगळीने केले. 

प्रमोद महाजनांशी माझी पहिली भेट 1979 मध्ये तर गोपीनाथ मुंडेची 1980 मध्ये झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आमची वाटचाल कित्येक वर्ष सोबतच होती. गोपीनाथराव आमदार होते तेव्हा मी भोकरदन पंचायत समितीचा सभापती होतो. माझ्या घरची परिस्थिती बेताचीच होती शिवाय घरून माझ्या राजकारणाला फारसा पाठिंबाही नव्हता. मी राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नव्हतो अशा परिस्थितीत माझी व्यथा मी गोपीनाथरावांना सांगितली. गोपीनाथरावांनी मला सोबत घेतले आणि गावाकडे माझे वडील आणि इतरांना एकत्र बसवून "माझ्यावर विश्वास टाका आणि रावसाहेबांना माझ्यासोबत द्या असे म्हणत समजूत काढली. अखेर वडिलांनी गोपीनाथरावांवर विश्वास टाकून मला राजकारणासाठी परवानगी दिली. 

त्यानंतर मराठवाड्यात आम्ही अनेक वर्ष सोबत राजकारण केले; गोपीनाथरावांचा प्रवास आमदार-खासदार, कारखान्याचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री असा होता. तोच डोळ्यासमोर ठेवला आणि त्याच दिशेने वाटचाल करत गेलो. योगायोगाने माझा राजकीय प्रवासही सभापती, आमदार, खासदार. कारखान्याचा चेअरमन, केंद्रीय मंत्री व आता भाजपचा प्रदेशाध्यक्ष असा सुरू आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी मला राजकारणात जमल्या त्या गोपीनाथरावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यामुळेच अशी प्रांजल कबुलीदेखील रावसाहेब दानवे यांनी या निमित्ताने दिली. 

(शब्दांकन : तुषार पाटील ) 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख