... आता गोपीनाथ मुंडे यांचे स्मारकही एकही झाड न तोडता होणार

... आता गोपीनाथ मुंडे यांचे स्मारकही एकही झाड न तोडता होणार

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारतांना एकही झाड तोडणार नाही, उलट आणखी झाडे लावणार असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले. त्यानंतर आता भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारतांना देखील एकही झाड तोडले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी सिडको प्रशासनाला तशा सचूना देत स्मारकाचा सुधारित नकाशा तयार करण्यास सांगितले आहे. 

औरंगाबादेत सध्या बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे या दोन दिवंगत नेत्यांच्या स्मारकाची चर्चा होत आहे. मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडे तोडल्यानंतर औरंगाबादेतील या दोन्ही स्मारकांसाठी किती झाडे तोडली जाणार याविषयीची चर्चा पर्यावरण प्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत होती. अगदी या मुद्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टिकास्त्र सोडले होते. दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतीच प्रियदर्शनी उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली. 

यावेळी स्मारक उभारतांना एकही झाड तोडणार नाही, उलट आणखी झाडे कशी लावता येतील याचा मी विचार करतोय असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी टिकाकारांची तोंड बंद केली होती. त्यानंतर आता गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी किती झाडे तोडली जाणार याविषयी चर्चा होत होती. औरंगाबाद महानगरपालिकेने मुंडे यांच्या स्मारकाच्या ठिकाणची झाडे तोडण्याच्या संदर्भाने जाहिरात प्रकाशित करून आक्षेपही मागवले होते. मग बाळासाहेबांचे स्मारक जर एकही झाड न तोडता होऊ शकत असेल तर मुंडेचे का नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. 

या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे यांचे जालना रोडवरील दूध डेअरी परिसरात करण्यात येणाऱ्या स्मारकाच्या ठिकाणची झाडे तोडण्यात येऊ नयेत अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर महानगरपालिकेने झाडे तोडण्यासाठी दिलेली जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा उपायुक्तांनी एक पत्र पाठवून सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना नियोजित मुंडे स्मारकाच्या परिसरातील झाडे न तोडता या प्रकल्पाचा सुधारित नकाशा तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असल्याचे कळवले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com