धनगर आरक्षण मिळाले नाही तर "कमळा' ला मतदान करू नका : गोपीचंद पडळकर

 धनगर आरक्षण मिळाले नाही तर "कमळा' ला मतदान करू नका : गोपीचंद पडळकर

लोणंद (जि. सातारा) : धनगर आरक्षणाबाबत गेंड्याची कातडी पांघरलेले आणि झोपेचे सोंग घेतलेले भाजप सरकार गेली चार वर्षे चालढकल करत आहे. येत्या दोन महिन्यात धनगर समाजाला " एसटी 'चे सर्टिफिकेट मिळाले नाही, तर मीच काय पण माझे आई- बाप, भाऊ जरी " कमळा ' च्या चिन्हावर उभे राहिले, तरी त्यांना मतदान करू नका, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. दरम्यान, सत्तेची मस्ती आलेल्या आमदार मकरंद पाटील यांनाही मतदान करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


खंडाळा तालुका कृती समितीतर्फे लोणंद बाजारतळ पटांगणावर धनगर आरक्षण परिषद व एल्गार महामेळाव्यात श्री. पडळकर बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी बापूसाहेब कोळेकर होते. धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर, शिवाजीराव बिडकर, आनंदराव शेळके- पाटील, रमेश धायगुडे- पाटील, टी. आर. गारळे, लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके- पाटील, लक्ष्मणराव शेळके-पाटील, नगरसेवक हणमंतराव शेळके- पाटील उपस्थित होते. 

पडळकर म्हणाले, ""धनगर समाज केवळ मत देण्यासाठी जन्माला आलेला नाही. राज्याच्या सत्तेत वाटा मिळण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेले आणि झोपेचे सोंग घेतलेले भाजप सरकार गेली चार वर्षे आरक्षणाबाबत चालढकल करत आहे. घटनेनुसार अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्राकडे शिफारशीची भाषा करत आहे. सरकारची शिफारशीची भाषा म्हणजे धनगर समाजाची चक्क फसवणूक आहे. येत्या दोन महिन्यात धनगर समाजाला "एसटी'चे सर्टिफिकेट मिळाले नाही, तर मीच काय पण माझे आई- बाप, भाऊ जरी "कमळा'च्या चिन्हावर उभे राहिले, तरी त्यांना मतदान करू नका. उत्तमराव जानकर म्हणाले, काहीही झाले तरी आरक्षणाचा हा अखेरचा लढा एसटी सर्टिफिकेट हातात घेतल्याखेरीज थांबणार नाही. फेब्रुवारीमध्ये मुंबई येथे आझाद मैदानावर या सरकारला गाडण्याचा निर्धार केला जाणार आहे. 

आम्हाला आमदार खासदार व्हायचे नाही... 
मला व उत्तमराव जानकर यांना आमदार, खासदार व मंत्री व्हायचे नाही. ही लढाई यासाठी नाही. आजवर ज्या धनगर नेत्यांनी समाजाचा घात केला त्यांची माती झाली, हे आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिले आहे. ती चूक आम्ही दोघे करणार नाही. धनगर समाजाच्या उत्कर्षासाठीचा अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू. माढा लोकसभा मतदारसंघात उत्तमराव जानकर यांनी उभे राहावे अशी मागणी होत आहे. पण आरक्षणाची लढाई जिंकल्यावरच उत्तमराव जानकर माढा लोकसभेच्या रणांगणात उतरतील, असे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवाजीराव शेळके- पाटील, अशोकराव धायगुडे- पाटील, अजय धायगुडे- पाटील, बबनराव शेळके- पाटील, चंद्रकांत शेळके- पाटील, संदीप शेळके- पाटील, डॉ. वसंतराव दगडे, प्रा. भीमदेव बुरुंगले, बाळासाहेब शेळके- पाटील, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदनाताई धायगुडे- पाटील, खंडाळ्याच्या नगराध्यक्षा लताताई नरुटे, नगरसेविका हेमलता कर्नवर उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com