good officers on swimming tank....others to face punishment | Sarkarnama

फिर्यादिशी चांगले वागणारे पोलिस स्विमिंग टॅंकवर! त्रास देणारे `पनिशमेंट`वर

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे : पोलिस ठाण्यात येणाऱ्या फिर्यादिला सन्मानाची वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांचा पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी आज गौरव केला. जिल्ह्यातील तब्बल ६७ पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला लोणावळ्यातील एका वाॅटर पार्कवर सहलीची व्यवस्था अधीक्षक कार्यालयाने केली होती. मात्र वेळोवेळी सूचना देऊनही आपल्या कार्यपद्धतीत बदल न करता फिर्यादीला वैताग देणाऱ्या ४८ अधिकारी व कर्मचारी यांना तंबी देण्यात आली.

पुणे : पोलिस ठाण्यात येणाऱ्या फिर्यादिला सन्मानाची वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांचा पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी आज गौरव केला. जिल्ह्यातील तब्बल ६७ पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला लोणावळ्यातील एका वाॅटर पार्कवर सहलीची व्यवस्था अधीक्षक कार्यालयाने केली होती. मात्र वेळोवेळी सूचना देऊनही आपल्या कार्यपद्धतीत बदल न करता फिर्यादीला वैताग देणाऱ्या ४८ अधिकारी व कर्मचारी यांना तंबी देण्यात आली.

अर्थात ही तंबी केवळ कागदोपत्री नसून पगारवाढ रोखण्यासाऱखी कारवाईही संबंधितांवर करण्यात आली आहे. पोलिसांनी फिर्यादीशी व्यवस्थित वागावे, त्यांची तक्रार तत्परतेने नोंदवून घ्यावी, फिर्याद नोंदविण्यासाठी त्याला हेलपाटे मारायला लावू नयेत, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयापासून ते पोलिस अधीक्षकांपर्यंत सर्वांनी दिल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही.

सुवेझ हक यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डमी तक्रारदार बनवून पोलिस ठाण्यात पाठविले होते. तेथे या डमी तक्रारदारांच्या अनुभवाच्या आधारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या. या डमी तक्रादारांच्या अनुभवाच्या आधारावर संबंधित पोलिस ठाण्याचे मूल्यमापन करण्यात आले. फिर्यादिला पिण्यासाठी पाणी विचारले का, त्याच्याशी सौजन्याने वागले का, त्याला फिर्याद न घेता परत पाठवले का, त्यासाठी कोणती कारणे दिली, ठाणे अंमलदार संबंधित तक्रारदाराशी कसे वागले, या आधारे पोलिसांना मार्क देण्यात आले.

याबाबत `सरकारनामा`शी बोलताना हक यांनी सांगितले की जेव्हा सुरवातीला हा प्रयोग केला होता. तेव्हा एकूण पोलिस ठाण्यापैकी दोन तृतीयांश ठाण्यांचे रिपोर्ट हे नकारात्मक होते. केवळ एक तृतीयांश पोलिस ठाण्यांतच फिर्यादिला चांगली वागणूक मिळाली. दुसऱ्यांदा हा प्रयोग केल्यानंतर हे चित्र आता उलट झाले आहे. दोन तृतीयांश पोलिस ठाण्यात आता फिर्यादिंना चांगली वागणूक मिळते आहे. तक्रार नोंदवून घेण्याचे सक्तीचे केल्याने पुणे जिल्ह्याचा क्राइम रेट हा ५० टक्क्यांनी वाढला आहे.

या आकडेवारीतूनच फिर्याद नोंदविण्यासाठी लोक पुढे येत असल्याचे आणि त्या नोंदवून घेतल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यात चांगले काम करणाऱ्यांना आज गौरविण्यात आले. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. याशिवाय त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एक दिवसासाठी वाॅटर पार्कची सहलही आयोजित करण्यात आली. इतर चुकारांचे आता याबाबत `प्रबोधन` करण्यात येत आहे. त्यासाठी कारवाईही केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख