कॉंग्रेसचा गोंदियाचा बुरूज ढासळणार की कायम राहणार?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीला चारीमुंड्या चित करीत पुन्हा मोदी लाट कायम असल्याचे दाखवून दिले. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेतही कॉंग्रेसने गोपालदास अग्रवाल यांच्या रूपाने गोंदिया विधानसभेत हॅटट्रिक मारली. परंतु, लोकसभेत कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा झालेला पराभव पाहता, आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदियाचा बुरूज ढासळणार की कायम राहणार हा प्रश्‍न चर्चेचा विषय ठरला आहे.
कॉंग्रेसचा गोंदियाचा बुरूज ढासळणार की कायम राहणार?

गोंदिया : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीला चारीमुंड्या चित करीत पुन्हा मोदी लाट कायम असल्याचे दाखवून दिले. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेतही कॉंग्रेसने गोपालदास अग्रवाल यांच्या रूपाने गोंदिया विधानसभेत हॅटट्रिक मारली. परंतु, लोकसभेत कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा झालेला पराभव पाहता, आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदियाचा बुरूज ढासळणार की कायम राहणार हा प्रश्‍न चर्चेचा विषय ठरला आहे.

2014 मध्ये मोदी लाट असताना कॉंग्रेस उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी 62 हजार 285 मते घेऊन गोंदिया विधानसभेत विजयाची हॅटट्रिक मारली. त्यांनी भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचा 10 हजार 665 मतांनी पराभव केला होता. तिरोडा-गोरेगाव विधानसभा, अर्जुनी मोरगाव व देवरी- आमगाव विधानसभेत मतदारांनी नरेंद्र मोदी यांना साथ दिली होती. तिरोडा-गोरेगाव विधानसभेत भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले यांनी 54 हजार 160 मते घेऊन अपक्ष निवडणूक लढलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बन्सोड यांचा 13 हजार 98 मतांनी पराभव केला होता. अर्जुनी मोरगाव विधानसभेत भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी 64 हजार 401 मते घेऊन कॉंग्रेसचे राजेशकुमार नंदागवळी यांचा 30 हजार 295 मतांनी पराभव केला होता. देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार संजय पुराम यांनी 62 हजार 593 मते घेत कॉंग्रेसचे रामरतन राऊत यांचा 18 हजार 298 मतांनी पराभव केला होता.

एकंदरीत अन्य तीन विधानसभा क्षेत्र वगळता 2014 च्या मोदी लाटेत गोंदिया विधानसभेचे तख्त कॉंग्रेसने कायम ठेवले. गोंदिया विधानसभा क्षेत्रात गोपालदास अग्रवाल यांनी केलेली विकासकामे, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्तेच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेची कामे लीलया हाताळण्याची त्यांची कुशाग्र बुद्धी या जोरावरच मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने राहिला. परंतु, 2019
च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप-शिवसेनाविरोधी पक्षांच्या नेत्यांची झोप उडवून दिली आहे. आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दिग्गज नेत्यांचा झालेला पराभव आणि आगामी विधानसभा निवडणूक, त्यामुळे रणनीती आखावी तरी कशी, याच बेतात आता नेते असल्याचे दिसून येत
आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानुसार मतदारांनी जातीय समीकरणाला फाटा देत विकासाला मते दिल्याचे बोलले जात आहे. उज्ज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, शेतकरी सन्मान योजना, आरोग्य विमा योजना, 2022 पर्यंत सगळ्यांना घरे, कर्जमाफी, स्कील डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया तसेच युवक-युवतींना रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराकरिता कर्जपुरवठा या
आधारावर मतदारांनी भाजपकडे कौल दिल्याचे दिसते.

लोकसभा आटोपली असताना प्रत्येक पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नजरा आता आगामी विधानसभा निवडणुकीवर खिळल्या आहेत. मोर्चेबांधणीला तशी लवकरच सुरुवात होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता, भाजप-शिवसेनेत अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढणार असल्याचे
चित्र आहे. दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मातब्बर नेते
आत्मचिंतन करून आगामी निवडणुकीला सामोरे जातील, असेही बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com