Gondia waiting for a pregnant woman due to Minister Gadakh | Sarkarnama

गरोदर महिलेची गोंदीयाची वाट मंत्री गडाख यांच्यामुळे सुकर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 एप्रिल 2020

संबंधित कुटुंबाची अडचण लक्षात घेवून मंत्री गडाख यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना अडचणीची परिस्थिती सांगून गर्भवती महिलेच्या तिच्या गावी जाण्यासाठीच्या प्रवासाची परवानगी घेतली.

सोनई : पत्नी आठ महिन्याची गरोदर असतानाही सुपे औद्योगिक वसाहत येथून सडकर्जुनी (जि. गोंदीया) येथे पायी मजल दरमजल करणारे चौधरी कुटूंब संकटाच्या अंधारात सापडले होते. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सर्व शासकीय परवानग्या मिळवत अवघडलेल्या महिलेस आज स्वखर्चाने त्यांच्या गावी पोच केले.

सुपे औद्योगिक वसाहत परिसरात सडकर्जुनी (जि. गोंदीया) येथील योगेंद्र चौधरी बांधकाम क्षेत्रात काम करत होते. लाॅकडाऊननंतर पोटाची खळगी भरण्यासाठी अडचण वाढल्याने त्यांनी पत्नी आठ महिन्याची गरोदर असतानाही पायी गावचा रस्ता धरला. मजल- दरमजल करत हे कुटूंब नेवासेफाटा येथे आल्यानंतर नेवासे  पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास हरकत घेवून ग्रामीण रुग्णालयात ठेवले होते. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या सांगण्यावरून सर्व तपासणी व उपचार करण्यात आले. हे कुटूंब येथे पाच दिवसापासून अडकले होते.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गुगळे यांनी ही माहिती जलसंधारण मंत्री गडाख यांना सांगितली. कुटुंबाचीअडचण लक्षात घेवून गडाख यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना अडचणीची परिस्थिती सांगून प्रवासाची परवानगी घेतली. सोनईचे माजी उपसरपंच जालिंदर चांदघोडे यांनी स्वतःचे वाहन दिले. गडाख यांनी डिझेल व इतर खर्चाला पंचवीस हजार रुपये दिले. शंकरराव गडाख युवा मंचच्या कार्यकर्त्यानी कोरडा शिधा व जेवणाचा डबाही दिला. आज पहाटे हे कुटूंब गावाकडे रवाना झाले.
दरम्यान, परजिल्ह्यातील असतानाही मंत्री गडाखांनी दिलेला आपुलकीचा आधार मनाला खुपच आनंद देवून गेला. काळजी करणारा माणूस नेवाशात लाभला आहे, अशी प्रतिक्रिया योगेंद्र चाैधरी यांनी दिली.

ती बाळंतीणही यवतमाळला पोहोच
मागील आठवड्यात पुण्याहून यवतमाळला पायी चाललेल्या निर्मला संदीप काळे यांची वडाळाबहिरोबा येथील बॅक एटीएमच्या आडोशाला प्रसूती झाली होती. पती, पत्नी व लहान बाळास आज प्रशासनाच्यावतीने यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात पोहोच करण्यात आले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख