'गोकुळ'च्या सत्तारूढ गटाला जोरदार धक्का

संघाचे संस्थापक कै. चुयकेर यांच्या पत्नी श्रीमती जयश्री ह्या सत्तारूढ गटात विद्यमान संचालिका आहेत. पण यावेळी त्यांनी स्वतः न लढण्याचा निर्णय घेत आपले पुत्र शशिकांत यांना संधी देण्याची मागणी केली आहे. शशिकांत यांच्या उमेदवारीविषयी सत्तारूढ गटाचे नेते अनुकल दिसत नसल्याने त्यांनीही आज डोंगळे, पाटील यांच्यासोबत स्वतंत्र ठराव सादर केले.
gokul ruling party setback
gokul ruling party setback

कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आज नाट्यपूर्ण घडामोडीनंतर संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, अरूण डोंगळे व संस्थापक कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे पुत्र शशिकांत यांनी सत्तारूढ गटाच्या नेत्यांऐवजी स्वतंत्रपणे आपल्याकडील ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. या घडामोडीवरून सत्तारूढ गटाच्या विद्यमान संचालकांतच उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. याचे पडसाद प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमटणार आहेत.

'गोकुळ'च्या निवडणुकीसाठी ठराव जमा करण्याची सद्या प्रक्रिया सुरू आहे. हे ठराव दाखल करण्याची 22 जानेवारी ही अंतिम तारीख आहे. तथापि आज सत्तारूढ गटाच्या संचालकांचे ठराव संघाचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे संकलित करण्यात येणार होते. त्यासाठी सकाळी दहा वाजता हे दोन्हीही नेते संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात दाखल झाले. त्याच दरम्यान विश्‍वास पाटील, श्री. डोंगळे व श्री. चुयेकर यांनी परस्पर 'गोकुळ' च्या कार्यालयाला लागूनच असलेल्या सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्या कार्यालयात जाऊन आपल्याकडील ठराव दाखल केले. ही माहिती समजताच सत्तारूढ गटाच्या दोन्ही नेत्यांसह उपस्थित समर्थकांत एकच खळबळ उडाली.

वर्षभरापुर्वी अपमानास्पद वागणूक देऊन अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्याने श्री. पाटील नाराज आहेत. पुर्वी श्री. महाडिक यांच्या मागे सावलीसारखे असलेल्या श्री. पाटील यांनी गेले वर्षभर श्री. महाडिक यांची भेटही घेतलेली नाही. एवढेच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज यांच्या प्रचारासाठी 'दक्षिण' मधील दूध संस्थांचा मेळावा घेऊन त्यांनी आपली रणनिती स्पष्ट केली होती. पण त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून श्री. महाडिक यांनी त्यांची शिरोली दुमाला येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही नाराज असलेल्या श्री. पाटील यांची दोन दिवसांपुर्वी संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात स्वतः पी. एन. यांनी समजूत काढली होती. त्यानंतर सर्व मिटले असे वाटत असतानाच श्री. पाटील यांनी आज स्वतंत्रपणे ठराव देत पी. एन. यांच्यासह श्री. महाडिक यांनाही धक्का दिला.

'गोकुळ' मल्टिस्टेट करण्याच्या निर्णयाला श्री. डोंगळे यांचा विरोध होता. या ठरावाच्या मंजुरीसाठी आयोजित सर्वसाधारण सभेतही श्री. डोंगळे समर्थकांनी त्याची चुणूक दाखवली होती. त्यानंतर थेट पत्रक काढून श्री. डोंगळे यांनी मल्टिस्टेटला विरोध करताना आपण लोकांसोबत असल्याचे जाहीर केले होते. श्री. डोंगळे यांच्या या भुमिकेविरोधात श्री. महाडिक यांनी टीका केली होती. श्री. डोंगळे यांना विधानसभेचे वेध लागल्याने त्यांनी ही भुमिका घेतल्याचा आरोप श्री. महाडिक यांनी केला होता. त्यालाही श्री. डोंगळे यांनी प्रत्युत्तर देताना माझ्या विधानसभेची काळजी कोणी करू नये असा सल्ला श्री. महाडिक यांचे नांव न घेता दिला होता. आज श्री. डोंगळे यांनी घेतलेल्या या भुमिकेमागेही हेच कारण असल्याचे बोलले जाते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com