'गोकुळ' मल्टिस्टेट अखेर रद्द   

संचालक मंडळाने मल्टिस्टेट न करण्याचा ठराव करण्याबरोबरच केंद्रीय निबंधकांकडे पाठवलेला प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पडसाद संघाच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत नक्की उमटतील. आमच्यामुळेच सत्ताधाऱ्यांना हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे विरोधकांकडून सांगितले जाईल तर सत्ताधारी गटाचे नेते पी. एन. पाटील यांच्यामुळे हा ठराव झाल्याचे सत्तारूढ गटाकडून सागंण्यात येईल. त्यामुळे या निर्णयावरूनही श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.
'गोकुळ' मल्टिस्टेट अखेर रद्द   

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट न करण्याचा ठराव आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. यासंदर्भात दिल्लीला पाठवलेला प्रस्तावही मागे घेण्याचे या बैठकीत ठरले.

'गोकुळ' मल्टिस्टेटवरून जिल्ह्याचे राजकारणही चांगलेच तापले होते. आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात जो राजकीय वाद सुरू आहे, त्याला खऱ्या अर्थाने धार गेल्यावर्षी "गोकुळ' मल्टिस्टेट करण्याच्या निर्णयाने आली. श्री. पाटील यांनी सर्व महाडिक विरोधकांना एकत्र करून यावर आवाज उठवला. तरीही गेल्यावर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर करून तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय निबंधकांकडे पाठवण्यात आला होता. याच सभेला चप्पल, खुर्च्या फेकाफेकीने गालबोट लागले होते.

त्यानंतर या ना त्या कारणाने हा विषय कायम चर्चेत राहीला. त्याचे पडसाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही उमटले. या निर्णयाला दूध उत्पादकांची सहमती मिळवण्यात किंवा त्याचे फायदे सांगण्यात सत्तारूढ गट अयशस्वी ठरला असताना विरोधकांनी मात्र त्याचे तोटे उत्पादकांपर्यंत पध्दतशीरपणे पोहचवल्याने उत्पादकांतही याविषयी नाराजी होती. त्याचे प्रतिबिंब लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उमटले. पण विधानसभेच्या तोंडावरच ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनीच या विषयाला तोंड फोडताना उत्पादकांचा विरोध असेल तर संघ मल्टिस्टेट न करण्याची जाहीर भुमिका घेतली. किंबहुना संचालक पद गेले तरी चालेल पण या निर्णयाविरोधात आपण उत्पादकांसोबत राहू असे त्यांनी जाहीर केले. यावरून त्यांचे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातही कलगीतुरा रंगला, पण त्याची पर्वा न करता श्री. डोंगळे आपल्या भुमिकेवर ठाम राहीले.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्काराच्या निमित्ताने संघात आलेले सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांनी श्री. महाडिक यांच्या उपस्थितीतच संघ मल्टिस्टेट न करण्याचा निर्णय घ्यावा असे सुचवले. यावरून या बैठकीला उपस्थित माजी खासदार धनंजय महाडिक व पी. एन. यांच्यात खडाजंगी झाली पण पी. एन. हेही ठाम राहील्याने अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी संघ मल्टिस्टेट न करण्याचा निर्णय घेत असल्याचे पत्रक प्रसिध्दीला दिले. त्यानंतर खऱ्या अर्थाने हा निर्णय थांबवण्याची प्रक्रिया सुरू झाली. 30 ऑक्‍टोंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही श्री. आपटे यांनी तशी घोषणा केली पण विरोधकांनी तसा ठराव याच सभेत करण्याची मागणी केली होती. तथापि कायदेशीर अडचण सांगून श्री. आपटे यांनी हा ठराव करता येणार नसल्याचे सांगितले.

वार्षिक सर्वसाधारण सभेनंतरही श्री. डोंगळे यांच्यासह काही संचालकांनी पुन्हा हा विषय संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवून संघ मल्टिस्टेट न करण्याचा ठराव करण्याची मागणी लावून धरली. त्याप्रमाणे संचालकांच्या आज झालेल्या बैठकीच्या विषयपत्रिकेवरही हा विषय ठेवण्यात आला. कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. श्री. डोंगळे हेच या ठरावाचे सूचक बनले.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com