godad maharaj temple predict disease from rat | Sarkarnama

वर्षभरात उंदरापासून रोगराई; गोदड महाराजांच्या संवस्तरीतील भाकीत

नीलेश दिवटे 
बुधवार, 25 मार्च 2020

या भाकितावर शेतकऱ्यांचा विश्वास असतो, त्यानुसार ते शेतीच्या कामाचे नियोजन करीत असतात.

कर्जत (नगर): यावर्षी पाऊस भरपूर होईल, धान्य मुबलक प्रमाणात पिकेल, मात्र प्रजेत आपापसात भांडणे होतील तसेच रोगराईपासून लोकांना त्रास होईल. उंदरापासून रोगराई पसरेल असे भाकित गोदड महाराज यांच्या संवत्सरीत वर्तविण्यात आले आहे. 

या भाकितावर शेतकऱ्यांचा विश्वास असतो, त्यानुसार ते शेतीच्या कामाचे नियोजन करीत असतात. सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज यांच्या मंदिरात संवत्सरीचे वाचन केले जाते. त्यानुसार संचारबंदी असताना देखील प्रथेप्रमाणे पुजारी, ग्रामस्थ आणि पंच कमिटीच्या अनुमतीने गर्दी टाळीत मोजक्याच पुजाऱ्यांसमवेत संत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी संवत्सरीचे वाचन केले. प्रत्येक वर्षी संवत्सरीचे वाचन ऐकण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात गर्दी करत असतात, मात्र आज कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गोदड महाराज मंदिरात सर्वांना प्रवेश बंद करण्यात आला. इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला. संवत्सरी वाचनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. 

भाकीतात त्यांनी सांगितले, की यावर्षी शार्वरी संवत्सर आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होईल, मात्र महाराष्ट्रात उशीराने येईल. यावर्षी पाऊस चांगला होईल. धान्य व फळे मुबलक प्रमाणात पिकतील, मात्र प्रजेमध्ये शेती व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर भांडणे होतील. तसेच रोगराईपासून लोकांना त्रास होईल. चोरांपासून मोठा त्रास होईल. उंदरापासून रोगराई पसरेल, तसेच आगीच्या घटनापासून त्रास संभवतो. लोकांची संपत्ती वाढेल, यामुळे लोकांना आनंद होईल. लोकर व लोखंड यांची महागाई वाढेल. यावर्षी पाऊस वाण्याच्या घरी आहे, त्यामुळे खंडित वृष्टी होईल, पण एकंदरीत पर्जन्यमान समाधान कारक राहील. सहा भाग पाऊस नद्या व पर्वतावर होईल. चार भाग पाऊस भुमिवर पडेल. यावर्षीच्या एकुन नक्षत्रापैकी पुनरवसू, पुष्य, मघा, पुरवा, उत्तरा, चित्रा, स्वाती या नक्षत्रात पाऊस समाधानकारक होईल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. एकुणच समाधानकारक पाऊस होईल. असे वर्तविण्यात आले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख