God met doctors in fourteen days | Sarkarnama

चाैदा दिवसांच्या `वनवासा`त डाॅक्टरांत भेटला देव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 एप्रिल 2020

नगर जिल्ह्यात आतापर्य़ंत 32 कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यापैैकी 18 रुग्ण बरे झाल्याने त्यांच्या 14 दिवसानंतरच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. या चाैदा दिवसाचा काळ या रुग्णांसाठी खडतर नक्कीच होता. परंतु तेथील डाॅक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टीमने त्यांची खूप चांगली काळजी घेतल्याचे हे रुग्ण आवर्जुन सांगतात.

नगर : श्रीरामाला 14 वर्षे वनवासात रहावे लागले. त्या काळात अनेक ऋणीमुनींनी त्यांना दिव्याश्र दिले. ते रावनाशी युद्धाच्या काळात त्यांना कामे आले. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनाही 14 दिवसांचा एक प्रकारे `वनवास`च भोगावा लागला. त्या काळात डाॅक्टररुपी देवांनी त्यांना निरोगी जगण्याचे मंत्र दिले. अशा प्रतिक्रिया कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून व्यक्त होत आहेत.

नगर जिल्ह्यात आतापर्य़ंत 32 कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यापैैकी 18 रुग्ण बरे झाल्याने त्यांच्या 14 दिवसानंतरच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. त्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले. या चाैदा दिवसाचा काळ या रुग्णांसाठी खडतर नक्कीच होता. परंतु तेथील डाॅक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टीमने त्यांची खूप चांगली काळजी घेतल्याचे हे रुग्ण आवर्जुन सांगतात. कोरोना झाल्याच्या मानसिक धक्क्यातून सावरणे, कुटुंबाची काळजी, एक प्रकारची अनामिक भितीने प्रारंभी या रुग्णांचा थरकाप उडाला. नंतर मात्र डाॅक्टरांनी केवळ आैषधोपचारच केला नाही, तर मानसिक धैर्य दिले. योग्य आहार, व्यायाम शिकवून आरोग्य चांगले ठेवले. आगामी काळात निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली घेवून हे रुग्ण बाहेर पडले. त्यामुळे त्यांनी देव रुपी डाॅक्टरांचे वारंवार आभार मानले.

मी डाॅक्टर असूनही मला धक्काच बसला

``मी स्वतः डॉक्‍टर असल्याने कोरोनाच्या लक्षणांबाबत मला माहिती होती. मात्र, मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. जिल्हा प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतरचा माझा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यावर मला धक्‍काच बसला,`` अशी आठवण कोरोनामुक्त झालेल्या नगरमधील डॉक्‍टरांनी सांगितली. 

ते म्हणाले, "औषधोपचारानंतर बरा होईपर्यंत मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. कोरोना हा बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. कोरोनाचे रुग्ण बरे होतात. जागतिक आरोग्य संघटना व शासनाने दिलेल्या माहितीवरच विश्‍वास ठेवावा. सोशल मीडियावरील माहितीची सत्यता नागरिकांनी पडताळून पाहिली पाहिजे. सोशल डिस्टन्सचे नियमपालन करावे.'' रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी पुरेसा आहार, पुरेशी झोप, प्राणायाम व योगासने करावीत. रक्‍तदाब, मधुमेह, दमा, कॉलेस्टेरॉल आदी समस्या असलेल्या रुग्णांनी विशेष दक्षता घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. 

डाॅक्टररुपी परमेश्वराने जगण्याची संधी दिलीय

``तब्बल 22 दिवसांपासून माझ्या कुटुंबापासून मी दूर आहे. कुटुंबियांची आठवण येते. मात्र, या जीवघेण्या कोरोनाच्या हल्ल्यातून डाॅक्टररुपी परमेश्वराने मला सुखरूप बाहेर काढले, याचे समाधान आहे. त्याने मला पुढील आयुष्य जगण्याची संधी दिलीय.`` 
कोरोनाच्या दोन्ही चाचण्या "निगेटिव्ह' आल्यानंतर कोरोनाबाधेतून सुटका झालेल्या संगमनेर तालुक्यातील एका युवकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

कष्ट हेच भांडवल असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील या युवकाला ध्यानीमनी नसताना, पाहुण्याकडून कोरोनाचा "वानवळा' मिळाला. "मी स्वतःच 30 मार्च रोजी निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेलो. त्यानंतर मी स्वतःला पूर्णपणे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. ज्या परमेश्‍वराने मला आजार दिला, तोच यातून बाहेर काढील, याची मनोमन खात्री होती. त्यामुळे विचलित झालो नाही. नगर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय पथकाने खूप चांगली ट्रीटमेंट दिली. जेवणाचीही व्यवस्थित सोय होती.`` असे अनुभव त्याने सांगितले. 

या दरम्यान एकांतवास भोगावा लागला. परमेश्वराची आराधना, जुन्या आठवणींत मन रमवणे सुरू होते. माझे कुटुंबीय व परिसरातील इतरांना "होम क्वारंटाईन' केल्याने झालेल्या त्रासाची कल्पना येत होती. माझी मुक्तता झाली. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संगमनेरातील एका रुग्णालयात 14 दिवसांसाठी ठेवून घेतलंय. खूप चांगली देखभाल हे पथक करीत आहे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचा, परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा धडा यातून मिळाला. "कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं!' चाचणीसाठी दिलेल्या 14 दिवसांपेक्षा पुढचे आरोग्यमय आयुष्य निश्‍चित उज्ज्वल आहे, हे ध्यानात ठेवून वैद्यकीय पथकाला साथ द्या. कोरोनाची व्यर्थ भीती बाळगू नका. लढा द्या. यश तुमचंच आहे, अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख