बापटसाहेब, पुरेसे पाणी तरी द्या; पुणेकरांचा संताप 

बापटसाहेब, पुरेसे पाणी तरी द्या; पुणेकरांचा संताप 

पुणे : पुण्याचा पाणीपुरवठा व त्यात होणारी कपात या विषयात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पाठोपाठ महापालिकेतील पदाधिकारीदेखील पुणेकरांची दिशाभूल करू लागले आहेत. पाणी कपात होणार नाही, असे पालकमंत्री बापट यांनी जाहीर केले होते. त्यानंतर पाच-सहा दिवसांतच पाणी कपातीला सुरवात झाली. एकवेळ पाणी पुरवठ्याची घोषणा करताना दिवाळीनंतर अमंलबजावणी करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र आता सोमवारपासूनच कपात करण्यात येणार असून त्याचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. 

पाणी कपातीचा पुणेकरांना कमीत-कमी फटका बसेल याची काळजी घेण्यात सत्ताधारी भाजपा व पालकमंत्री गिरीश बापट यांना सपशेल अपयश आले आहे. शहरात आजही अनेक भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. नागरीकांनी तक्रारी केल्यातरी पाणी पुरवठा विभागाचे आधिकारी व कर्मचारी दाद देत नाहीत. पाण्याचा प्रश्‍न ऑक्‍टोबर महिन्यातच मे महिन्यासारखा करण्यात आला आहे.

सत्ताधारीच साफ दुर्लक्ष करीत असल्याने लोकांचा संताप अधिक आहे. पाणी मिळत नाही. तक्रार तरी कुणाकडे करावची अशी वेळ पुणेकरांवर आली आहे. मॉडेल कॉलनीसह शहराच्या पेठांच्या भागातही पुरेसा पाणी पुरवठा होत नाही, ही नागरीकांची प्रमुख तक्रार आहे.

पालकमंत्री बापट हे पुण्याचे कारभारी आहेत. पाण्यासारख्या महत्वाच्या विषयावर बापट यांनी पुढाकार घेऊन पाणी पुरवठ्याचा विषय मार्गी लावायला हवा होता. संकटाच्यावेळी पालकमंत्र्यांनी पुणेकरांना विश्‍वासात घेत पाटबंधारे विभाग व पालिका प्रशासनात समन्वय साधण्याची आवश्‍यकता होती. मात्र पालकमंत्र्यांनी पुण्याच्या पाण्यासारख्या महत्वाच्या प्रश्‍नाकडे साफ दुर्लक्ष केले. सारी जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे सोपवली. त्यातून गोंधळ कमी होण्याऐवजी त्यात भरच पडली असून ऐनदिवाळीत तरी पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार का, असा प्रश्‍न पुणेकर विचारत आहेत.

महापालिकेकडून सोमवारपासून एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. एकवेळ पाणी दिले तरी चालेल मात्र ते पुरेशा दाबाने द्या, अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात येत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com