Give Reservation then come to Jalgaon - Sambhaji Brigade to CM | Sarkarnama

मराठा आरक्षण द्यावे, मगच मुख्यमंत्र्यांनी जळगावात यावे: संजीव पाटील 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी मारली तेव्हा शासनाचे आपत्ती व्यवस्थापनवाले कोठे गेले होते. तशी व्यवस्था शासनाने तेथे तयार ठेवली नव्हती. जर ती व्यवस्था असती तर काकासाहेब वाचले असते. यामुळे केवळ मुख्यमंत्रीच काकासाहेबांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे - संभाजी ब्रिगेड

जळगाव : ''मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस टोलवाटोलवी करीत आहेत. औरंगाबादला आत्मदहन करणाऱ्या (कै.)काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यास राज्य शासनाला वेळ नाही. मात्र, महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते जळगावात येत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांना जळगावमध्ये पाय ठेवू देणार नाही. ते झेड सुरक्षा यंत्रणेतही आले तरी आमचे मावळे गनिमी काव्याने घेराव घालतील," असा इशारा संभाजी ब्रिगेडचे संजीव पाटील, प्रतिभा शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

संभाजी ब्रिगेडचे पाटील म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा समाजाने आतापर्यंत 58 मोर्चे शांततेने मोर्चे काढले. मात्र, शासनाला शांततेचे मोर्चे नको आहेत. मोर्चे काढून, जलसमाधी घेऊनही शासनाला जाग आलेली नाही. काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी मारली तेव्हा शासनाचे आपत्ती व्यवस्थापनवाले कोठे गेले होते. तशी व्यवस्था शासनाने तेथे तयार ठेवली नव्हती. जर ती व्यवस्था असती तर काकासाहेब वाचले असते. यामुळे केवळ मुख्यमंत्रीच काकासाहेबांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे," 

ते पुढे म्हणाले, "आरक्षणासाठी आंदोलने सुरू असताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांसह अनेक मंत्री आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. साधी श्रद्धांजली काकासाहेबांना शासनाने वाहिली नाही. यामुळे आमचा रोष वाढला आहे. आंदोलनाची भाषा सरकारला कळत नसेल तर भगतसिंगाची भाषा आता आम्ही सांगू. मुख्यमंत्री फडणवीस जळगावमध्ये येणार आहेत. मात्र त्यांनी अगोदर मराठा आरक्षण द्यावे. नंतर यावे. अन्यथा त्यांना आमचे मावळे घेराव घालतील. पाय ठेवू देणार नाही." 

छावा संघटनेचे भीमराव मराठे, जेडीसीसी बॅंकेचे संजय पवार, प्रमोद पाटील, एस.बी.पाटील, ऍड. सचिन पाटील, वंदना पाटील, रेखा पाटील, संजय सोनवणे, गोपाल दर्जी, आनंदराव मराठे, बापूसाहेब पाटील, रवींद्र पाटील, आर.व्ही.पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख